सिंधुदुर्ग : महंत रामगिरी महाराज यांच्या मुस्लिमविरोधी वक्तव्यानंतर नाशिक, छत्रपती संभाजीनगरसह राज्यातील काही भागात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.
भाजप आमदार नितेश राणे यांनी रामगिरी महाराज यांच्या समर्थनार्थ निघालेल्या मोर्चात प्रक्षोभक वक्तव्य केले. या विरोधात एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांची तिरंगा रॅली मुंबईकडे रवाना झाली आहेत. यावरून आता भाजप नेते निलेश राणे यांनी इम्तियाज जलील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
छत्रपती संभाजीनगरवरून इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली निघालेली तिरंगा रॅली नाशिकहून मुंबईच्या दिशेने रवाना झाली आहे. छ. संभाजीनगर, नाशिकहून शेकडो गाड्यांचा ताफा तिरंगा रॅलीमध्ये सहभागी झाला आहे. इम्तियाज जलील हे मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भारताच्या संविधानाची प्रत देणार आहे. यावरूनच निलेश राणे यांनी इम्तियाज जलील यांना डिवचले आहे.
इम्तियाज जलील यांच्या नावातच जलील आहे, हे आम्हाला संविधान शिकवणार. इम्तियाज जलील यांना जन गन मन म्हणायला सांगा. यांना भारत माता की जय म्हणायला सांगा आणि मग रॅली काढायला सांगा. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पोलिस बघतील. यांनी केव्हा कायदा व सुव्यवस्था पाळली. औरंग्याच्या थडग्यावर डोके टेकवणारे देश आणि संविधान आम्हाला शिकवणार? हा माणूस खरच भारतीय असेल तर पहिले जन गण मन म्हणून दाखवायला सांगा. तू या देशापेक्षा पाकिस्तानचा जास्त वाटतो, तुम्ही भारतीय असल्याचा आमचा आक्षेप असल्याची टीका निलेश राणे यांनी केली आहे.
मी लढणारा, मागे हटणार नाही : इम्तियाज जलील
दरम्यान, इगतपुरी येथे इम्तियाज जलील यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, रामगिरी महाराज हे भोंदू बाबा आहेत. त्यांच्यावर सरकारने कारवाई करावी. भाजप आमदार नितेश राणेंवर सरकार कारवाई करत नाही. मला मुंबईत बोलावले, मी येतो , कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी सरकारने काम करावे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बेताल वक्तव्य करणा-यांना पाठीशी घालतात. रामगिरी महाराजांना मुख्यमंत्री आश्रय देतात. मी लढणारा आहे, मागे हटणार नाही. असे इम्तियाज जलील यांनी म्हटले आहे.