पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मंगळवारी लोकसंख्या नियंत्रणाबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल विधानसभेत माफी मागितली असून मला माझ्या वक्तव्याचा खेद वाटतो, असे त्यांनी म्हटले आहे. नितीश कुमार बुधवारी विधानसभेत म्हणाले की, मी महिला शिक्षणावर बोललो होतो. मी माझ्या विधानाबद्दल माफी मागतो आणि ते विधान मागे घेतो. बिहार सरकारने महिलांसाठी खूप काम केले आहे. मंगळवारी तुम्ही लोक माझ्याशी सहमत होता पण आज वरून आदेश आल्यामुळे तुम्ही माझ्यावर टीका करत आहोत. मला माझ्या वक्तव्याचा खेद वाटतो आणि माझे शब्द मागे घेतो. माझ्यावर टीका करणाऱ्यांचेही मी अभिनंदन करतो, असे ते म्हणाले.
सभागृहाबाहेर पत्रकारांशी संवाद साधताना नितीश कुमार म्हणाले की, आम्ही इंटरमिजिएटपर्यंत मुलींच्या शिक्षणासाठी खूप काम केले आहे. आम्ही महिलांच्या उत्थानाबद्दल बोलत होतो, हेच आम्ही बोललो. मुले-मुली यांचा संबंधाबद्दलचा उल्लेख माझ्या तोंडून निघाला असेल तर मी त्याबद्दल माफी मागतो, असे ते म्हणाले. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मंगळवारी लोकसंख्या नियंत्रणाबाबत विधानसभेत केलेल्या विधानामुळे बिहारमध्येच नव्हे तर देशभरातून त्यांच्यावर टीका होत आहे.