नवी दिल्ली/ पाटणा : बिहारमधील सत्ताधारी महाआघाडीत सर्व काही सामान्य नाही. तसेच ‘इंडिया’ आघाडीला एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. वृत्तसंस्थेला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीश पुन्हा एनडीएत पुनरागमन करणार आहेत. भाजप नेतृत्वाने त्यांच्या पुनरागमनाला मान्यता दिली आहे. नितीश कुमार पुन्हा बाजू बदलू शकतात. ते पुन्हा एनडीएमध्ये सामील होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत बिहार विधानसभा बरखास्त होऊ शकते. युतीमध्ये परतायचे असल्यास भाजपने नितीश कुमारांसमोर एक अट ठेवली आहे. नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपद सोडले पाहिजे, असे भाजपचे म्हणणे आहे.
तसेच माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी सतत म्हणत आहेत की, राज्यात मोठे काहीतरी होणार आहे. त्याची सुरुवात आता दिसू लागली आहे. काही तासांपूर्वी आरजेडी सुप्रीमो लालू प्रसाद यादव यांची कन्या रोहिणी आचार्य यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर सोशल मीडियावर हल्लाबोल केला होता. त्यानंतर काही वेळाने रोहिणीने सोशल मीडियावर जे लिहिले होते ते डिलीटही केले.
भाजपने सर्व आमदारांना पाटण्याला बोलाविले
भाजपने आपल्या सर्व आमदारांना पाटण्याला बोलावले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सर्व आमदारांना गुरुवारी ४ वाजेपर्यंत पाटण्यात हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सातत्याने बदलणाऱ्या घडामोडींवरून जितन राम मांझी यांचे भाकीत खरे ठरणार की नाही, असे दिसू लागले आहे. मांझी यांनी आधीच आपल्या आमदारांना बिहारच्या बाहेर न जाण्याची आणि शक्यतो पटनामध्ये राहण्यास सांगितले होते.