मुंबई : प्रतिनिधी
पीओपी गणेश मूर्तीच्या विसर्जनासंदर्भात अजूनही तोडगा निघालेला नाही. यासंदर्भात राज्य सरकारने हायकोर्टाकडे आणखी वेळ मागितला. त्यामुळे आता मुंबई हायकोर्टाने याबाबत अहवाल सादर करण्यासाठी २१ जुलैपर्यंत मुदत दिली आहे. आता पुढील सुनावणी २४ जुलै रोजी होणार आहे.
यंदाच्या गणेशोत्सवात पीओपीच्या मोठ्या मूर्तींच्या विसर्जनाबाबत उच्चस्तरीय अधिका-यांच्या बैठका सुरू आहेत. यावर अद्याप तोडगा निघालेला नाही, अशी माहिती राज्य सरकारतर्फे महाधिवक्ता डॉ. बिरेंद्र सराफ यांनी मुंबई उच्च न्यायालयात दिली. मोठ्या आकाराच्या गणेशमूर्तींच्या विसर्जनाबाबत धोरण ठरवण्यासाठी राज्य सरकारला किमान ३ आठवड्यांची मुदतवाढ द्यावी, अशी विनंती महाधिवक्ता डॉ. बिरेंद्र सराफ यांनी केली. त्यावर हायकोर्टाने २१ जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे. या प्रकरणावरील सुनावणी २४ जुलैपर्यंत तहकूब केली आहे.
तातडीने निर्णय घ्या
आगामी गणेशोत्सव जवळ अवघ्या ५७ दिवसांवर आल्याचे ध्यानात ठेवत राज्य सरकारने लवकर निर्णय घ्यावा, अशी सूचना सोमवारी मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठाने राज्य सरकारला केली आहे.