परभणी / प्रतिनिधी
भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. जिल्ह्यातील ४ विधानसभा मतदारसंघात निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. त्यासाठी सर्व नोडल अधिका-यांनी समन्वयाने आपापली जबाबदारी चोखपणे पार पाडावी, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आज निवडणुकीशी संबंधित सर्व नोडल अधिका-यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी जनार्धन विधाते, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर यांच्यासह सर्व नोडल अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
पुढे बोलताना जिल्हाधिकारी गावडे म्हणाले की, लोकसभेची निवडणूक प्रक्रिया ही सर्व अधिकारी व कर्मचा-यांच्या समन्वयातून यशस्वीपणे पार पाडण्यात आली. त्याच पध्दतीने आता विधानसभेची निवडणूक प्रक्रिया पार पाडावयाची आहे. त्यामुळे प्रत्येकाने सोपविलेले काम प्रामाणिकपणे आणि जबाबदारीने पार पाडावे. प्रत्येक सुचनेचे काटेकोरपणे पालन करावे.
निवडणूक विषयक दैनंदिन अहवाल वेळेत पाठवावेत. कुठल्याही कामात दिरंगाई करु नये. आदर्श आचारसंहितेची प्रभावीपणे अंमलबजावणी करतानाच मतदान प्रक्रिया सुलभपणे पार पडेल असे नियोजन करावे. ८५ वर्षांवरील मतदारांसाठी गृह मतदानाचे अचूकपणे नियोजन करावे. पोस्टल मतदान प्रक्रिया दक्षतेने राबवावी. तसेच विधानसभेच्या निवडणुकीत जास्तीत जास्त मतदारांनी मतदान प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी स्वीप अंतर्गत विविध जनजागृतीपर उपक्रम राबवावेत.
प्रारंभी अपर जिल्हाधिकारी डॉ. काळे यांनी नोडल अधिका-यांना सोपविलेल्या कामाबद्दल मार्गदर्शन केले. उपजिल्हा निवडणूक अधिकारी विधाते यांनीही नोडल अधिका-यांना मार्गदर्शन केले. यावेळी नोडल अधिका-यांनी मांडलेल्या शंकांचे निरसन करण्यात आले. यावेळी बैठकीस नोडल अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.