तेलअवीव : इस्रायल आतापर्यंत गाझाच्या उत्तरेकडील भागातच हल्ले करत होता, मात्र आता दक्षिणेकडील भागही सुरक्षित राहिलेला नाही. इस्रायलचे म्हणणे आहे की मानवतावादी मदतीसाठी सोडलेल्या भागातूनही हमास आमच्यावर रॉकेट डागत आहे. आता हमास हल्ले करत असल्याने प्रत्युत्तरात आम्हाला हल्ले करावे लागतील आणि हे हल्ले निर्वासितांच्या छावण्यांवरही होऊ शकतात. अशा परिस्थितीत गाझामध्ये आश्रयासाठी कोणतीही सुरक्षित जागा उरणार नाही.
इस्रायलने नकाशे, सॅटेलाइट फोटो आणि व्हीडीओ शेअर केले आहेत, ज्यामध्ये हमासचे दहशतवादी रॉकेट डागत असल्याचे दिसून येते. गाझामधील अल-मावासी भागातून हे हल्ले करण्यात आले. इस्त्रायली लष्कराचे म्हणणे आहे की, १४ रॉकेट डागण्यात आले आहेत. गाझामधील निर्वासितांसाठी ज्या भागात तंबू उभारण्यात आले आहेत, त्या भागातून ही रॉकेट डागण्यात आली आहेत. इस्त्रायल आता या भागांनाही लक्ष्य करेल आणि त्यामुळे निर्वासितांसाठी कोणतेही क्षेत्र सुरक्षित नाही, असे मानले जात आहे. इस्रायली लष्कराच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, आमचे ऑपरेशन पुढे काय असेल हे आम्ही सांगू शकत नाही, परंतु आम्ही गाझामधील लोकांना सतत अपडेट करत आहोत जेणेकरून त्यांचे कमीत कमी नुकसान होईल. दरम्यान, युनायटेड नेशन्सचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांनी युएनएससीला युद्धविराम साध्य करण्यासाठी आपल्या अधिकारांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.
शरणार्थींना रुग्णालये, शाळा आणि कम्युनिटी हॉलमध्ये राहण्याची परवानगी द्यावी. या ठिकाणांना कोणत्याही बाजूने लक्ष्य केले जाऊ नये. आंतरराष्ट्रीय मानवाधिकार नियमांनुसारही त्यांना लक्ष्य केले जाऊ शकत नाही. इस्रायलनेही हे करणे टाळावे असे संयुक्त राष्ट्रांचे म्हणणे आहे. हमास आपल्या दहशतवादी कारवायांसाठी अशा तळांचा वापर करत असल्याचे इस्रायलचे म्हणणे आहे. हाच आरोप करत इस्रायलने नुकतेच गाझातील सर्वात मोठ्या रुग्णालय अल-शिफावर हल्ला करून वॉर्डमध्ये जाऊन दहशतवाद्यांचा शोध घेतला. एमआरआय मशीनमध्येही एके-४७ रायफल सापडल्याचा दावा इस्रायलने केला होता.