मुंबई : प्रतिनिधी
अदानी फाऊंडेशनकडे राज्यातील जवळपास ९ शाळांचे व्यवस्थापन हस्तांतरित करण्याचा शासन निर्णय (जीआर) शालेय शिक्षण विभागाने शुक्रवारी काढला. यात महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घुस येथील एका खासगी शाळेचा समावेश आहे. राज्य सरकारच्या या निर्णयावर आता महाराष्ट्राचा ७/१२ च अदानींच्या नावे करणार का, असा प्रश्न विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारला केला आहे.
आता महाराष्ट्राचा ७/१२ च अदानींच्या नावे करणार का, असा प्रश्न विजय वडेट्टीवार यांनी राज्यातील महायुती सरकारला केला आहे. यासंदर्भातील एक पोस्ट देखील त्यांनी सोशल मीडियावर केली आहे. शाळेच्या भिंतीवर आदराने आणि विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी लावलेल्या राष्ट्रपिता महात्मा गांधी, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमांसोबत आता गौतम अदानी यांचा पण फोटो लावायची तयारी शिंदे, फडणवीस आणि अजित पवार सरकारकडून सुरू झाल्याचा टोला देखील त्यांनी लगावला आहे.
आपल्या पोस्टमध्ये ते म्हणतात, महाराष्ट्राला महायुती सरकारएवढाच धोका अदानीचा देखील आहे. एअरपोर्ट, वीज, धारावी, मुंबईतील जमिनी झाल्या आता शाळांवर पण अदानींचा डोळा आहे. महायुती सरकारने संपूर्ण महाराष्ट्राचा ७/१२च अदानी अँड कंपनीला द्यायचा ठरवलं आहे का? असा सवाल देखील वडेट्टीवार यांनी सरकारला केला आहे.
राज्यातील नऊ शाळांचे व्यवस्थापन अदानी फाऊंडेशनकडे हस्तांतरित करण्याचा शासन निर्णय (जीआर) शालेय शिक्षण विभागाने शुक्रवारी काढला. त्यानुसार, चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घुस येथील माऊंट कार्मेल कॉन्व्हेंट शाळेचे व्यवस्थापन अदानी फाऊंडेशनकडे सोपविण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. ही शाळा विनाअनुदानित असून इथे पहिली ते बारावीपर्यंतचे शिक्षण उपलब्ध आहे.
शिक्षणाचे खासगीकरण करून आता शाळांमध्ये संघाचे विचार शिकवले जाणार, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली आहे. संपूर्ण महाराष्ट्राला विकण्याचे काम हे सरकार करत आहे. महाराष्ट्राचा स्वाभिमानच त्यांनी गुजरातकडे गहाण ठेवल्याची टिप्पणी देखील त्यांनी केली आहे.
शाळेच्या भिंतीवर अदानींचा फोटो लावणार का?
वडेट्टीवार म्हणाले, शाळेच्या भिंतीवर आदराने आणि विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी लावलेल्या महात्मा गांधी, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांबरोबरच आता गौतम अदानी यांचा पण फोटो लावायची तयारी शिंदे, फडणवीस व अजित पवार सरकारकडून सुरू झाली आहे.