17.6 C
Latur
Thursday, November 27, 2025
Homeउद्योगआता क्रेडिट स्कोअर ७ दिवसांत अपडेट होणार

आता क्रेडिट स्कोअर ७ दिवसांत अपडेट होणार

आरबीआयची नियमावली, एका महिन्यात पाचवेळा कर्जदाराची माहिती अपडेट होणार, तारखाही जाहीर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया लवकरच एक नियम लागू करणार आहे. त्यानुसार एप्रिल २०२६ पासून लोकांना क्रेडिट स्कोअरसाठी फार वाट पाहावी लागणार नाही. तुमचा क्रेडिट स्कोअर दर ७ दिवसांनी अपडेट केला जाणार आहे. नव्या नियमानुसार आता क्रेडिट स्कोअर एका महिन्यात दोन वेळा अपडेट करण्याऐवजी दर ७ दिवसांनंतर अपडेट केला जाणार आहे. हा बदल आरबीआयच्या ड्राफ्ट क्रेडिट इन्फॉर्मेशन रिपोर्टिंग (प्रथम दुरुस्ती) निर्देश २०२५ नुसार लागू केला जाणार आहे.

या प्रस्तावानुसार सर्व क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपन्यांना एका महिन्यात पाचवेळा कर्जदाराची माहिती अपडेट करावी लागेल. यासाठीच्या तारखा दर महिन्याच्या ७, १४, २१, २८ आणि महिन्याचा शेवटचा दिवस अशा असतील. आरबीआयच्या या पावलाचा उद्देश क्रेडिट डेटा रिपोर्टिंग आणि अपडेट करण्याच्या पद्धतीमध्ये मोठा बदल करणे आहे. यामुळे ज्या लोकांचे कर्ज लेटेस्ट क्रेडिट स्कोअरमुळे प्रलंबित आहे, त्यांना फायदा होणार आहे.

बँक किंवा वित्तीय संस्थांना महिन्यात एकदा किंवा दोनवेळा सिबिल, इक्विफॅक्स, एक्सपीरियन किंवा क्रिफ हाई मार्क या सारख्या क्रेडिट ब्यूरोला डेटा पाठवायला लागत असे. आता बँक किंवा एनबीएफसी महिन्यात एकदा क्रेडिट रेकॉर्डची माहिती पाठवतील. मात्र, त्यांना दरम्यानच्या बदलांची माहिती द्यावी लागेल. ज्यामध्ये नव्याने कर्ज दिले गेले असेल, बंद केलेली खाती, कर्ज परतफेड, कर्जदाराची माहिती यातील काही बदल, कर्जाचे वर्गीकरण यातील बदल याची माहिती, म्हणजेच एखाद्याने क्रेडिट कार्ड बंद केले, कर्जाची पूर्ण परतफेड केली किंवा रिपेमेंट ट्रॅक रेकॉर्डमध्ये सुधारणा केली तर हे बदल काही दिवसांत त्याच्या क्रेडिट रिपोर्टमध्ये दिसणार आहेत.

क्रेडिट स्कोअरसाठी आता प्रतीक्षा नाही
ईएमआय किंवा कर्ज परतफेडीनंतर क्रेडिट स्कोअरÞमध्ये सुधारणांसाठी दीर्घकाळ वाट पाहावी लागणार नाही. क्रेडिट स्कोअरमध्ये ज्या वेगाने सुधारणा होईल, त्याच वेगाने कर्ज मंजूर होईल. वेळोवेळी डेटा अपडेट झाल्याचा फायदा क्रेडिट हेल्थवर दिसून येईल. त्यामुळे चांगल्या व्याज दरावर कर्ज मिळण्यास मदत होणार आहे. बँकेजवळ तुमचा लेटेस्ट अपडेटेड डेटा असल्यास नवे कार्ड आणि कर्जासाठी अर्ज करता, त्यावेळी कोणतीही अडचण येणार नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR