पाटणा : मोबाइल फोन अॅपच्या माध्यमातून मतदान (ई-मतदान) करण्याची परवानगी मिळालेले बिहार हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. राज्य निवडणूक आयुक्त दीपक प्रसाद यांनी शुक्रवारी सायंकाळी ही घोषणा केली. शनिवारी पाटणा, रोहतास आणि पूर्व चंपारण या तीन जिल्ह्यांतील ६ नगरपरिषदांमध्ये मतदान झाले. त्यावेळी तेथील विशिष्ट मतदारांना या पद्धतीनेही मतदान करता येईल.
दीपक प्रसाद यांनी सांगितले की, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती, गरोदर महिला आणि स्थलांतर केलेले मतदार अशा व्यक्ती मतदान केंद्रावर जाऊन मतदान करू शकत नाही. त्यांना या ई-मतदान योजनेचा लाभ घेता येईल. त्यासाठी मतदानासाठी ‘ी-रएउइऌफ’ अॅप डाऊनलोड करणे आवश्यक आहे.
हे अॅप सध्या केवळ अँड्रॉइड फोनवरच उपलब्ध आहे. मतदारांनी हे अॅप आपल्या मोबाइलवर डाऊनलोड करून ते त्यांच्या मतदार यादीतील नोंदणीकृत फोन नंबरशी लिंक करणे आवश्यक आहे. सी-डॅक या संस्थेने हे अॅप विकसित केले असून दुसरे एक अॅप राज्य निवडणूक आयोगानेही तयार केले आहे.
असे करता येईल ई-मतदान
ई-मतदानासाठी फक्त दोन नोंदणीकृत मतदार एका फोन नंबरवरून लॉगिन करू शकतात. प्रत्येक मतदाराचे ओळखपत्र तपासून मतदानाची वैधता निश्चित केली जाईल. ज्यांच्याकडे मोबाइल नाही, त्यांनाही राज्य निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवरून मतदानाची सुविधा उपलब्ध आहे.