मुंबई : प्रतिनिधी
जागतिक पातळीवर गेल्या १७५ वर्षांत यंदाचा ऑक्टोबर महिना दुस-या क्रमाकांचा उष्ण महिना ठरला आहे तर भारत आणि पाकिस्तान आणि दक्षिण अमेरिकेत यंदा ऑक्टोबर महिना आजवरचा सर्वांधिक उष्ण ठरला. ऑक्टोबर महिन्यात जगातील १२ टक्के भूभागावर सरासरीपेक्षा जास्त तापमान होते, असे निरीक्षण अमेरिकेच्या नॅशनल ओशनिक अॅण्ड अॅटमॉस्फेरिक अॅडमिनिस्ट्रेशन (नोआ) यांनी दिली आहे.
नॅशनल ओशेनिक अॅण्ड अॅटमॉस्मफेरिक अॅडमिनिस्ट्रेशनने दिलेल्या माहितीनुसार जागतिक पातळीचा विचार करता यंदाचा ऑक्टोबर महिना आजवरचा दुस-या क्रमाकांचा उष्ण महिना ठरला. २० व्या शतकातील ऑक्टोबर महिन्यातील सरासरी जागतिक तापमान १४ अंश सेल्सिअस आहे, त्या तुलनेत यंदाच्या ऑक्टोबरमधील तापमान १.३२ अंश सेल्सिअसने जास्त राहिले. यापूर्वी २०२३ मधील ऑक्टोबर महिना आजवरचा सर्वाधिक उष्ण ऑक्टोबर महिना ठरला होता. ऑक्टोबर २०२३ मध्ये जागतिक तापमान सरासरीपेक्षा १.३७ अंश सेल्सिअसने जास्त होते.
यंदा ऑस्ट्रेलियाने १९१० नंतर दुस-या क्रमांकाचा उष्ण ऑक्टोबर अनुभला आहे. चालू वर्षातील पहिल्या दहा महिन्यांतील तापमानाचा विचार करता २० व्या शतकातील सरासरी तापमानापेक्षा १.२८ अंश सेल्सिअसने जास्त तापमान राहिले. आफ्रिका, युरोप, उत्तर अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि शेजारील देश, दक्षिण अमेरिकेत १७५ वर्षांच्या हवामान इतिहासात यंदाचे पहिले दहा महिने उष्ण महिने ठरले आहेत. वाढत्या तापमानामुळे फक्त जमिनीवरील तापमान वाढते, असे नाही. समुद्राच्या पृष्ठभागावरील तापमानही वाढत आहे. त्यामुळे जागतिक स्तरावर समुद्राच्या पृष्ठभागावरील तापमानातही वाढ झाल्याचे दिसून आले.
अमेरिकेत थंडीच्या महिन्यांमध्ये पश्चिमी थंड वा-याचे झोत कमी प्रमाणात आल्याने महासागरांच्या पृष्ठभागांच्या तापमानातही वाढ झाल्याचे दिसून आले. या तापमान वृद्धीमुळे जागतिक पातळीवरील हवामानाच्या प्रारुपाला मोठा धक्का बसला आहे. जागतिक पातळीवर ऑक्टोबर महिन्यात स्पेनमध्ये महापूर आला. त्यात २०० लोकांचा जीव गेला. ट्रॉमी चक्रीवादळामुळे फिलिपिन्सला अतिवृष्टी, भूस्खलनाचा सामना करावा लागला. त्यात १२५ लोकांचा जीव गेला. दक्षिण अमेरिकेला भीषण दुष्काळाचा सामना करावा लागला.
आधीच वर्तवली होती शक्यता
नोआने २०२४ हे वर्ष हवामानाच्या इतिहासात आजवरचे सर्वाधिक उष्ण वर्ष ठरण्याची शक्यता व्यक्त केली होती. या पूर्वी कोपरनिकस क्लायमेट चेंज सर्व्हिसनेही २०२४ हे वर्ष इतिहासातील सर्वांत उष्ण वर्ष ठरण्याची शक्यता वर्तविली होती. या पूर्वी २०२३ हे आजवरचे सर्वांत उष्ण वर्ष म्हणून नोंद झालेले आहे. त्यावर्षीचे तापमान सरासरीपेक्षा १.४८ अंश सेल्सिअसने जास्त होते.