गुवाहाटी : मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडच्या शतकी खेळीच्या बळावर भारताने निर्धारित 20 षटकात तीन विकेटच्या मोबदल्यात २२२ धावांचा डोंगर उभरला. तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादव यांनी छोटेखानी खेळी करत धावसंख्या वाढवली. ऑस्ट्रेलियाकडून एकाही गोलंदाजाला भेदक मारा करता आला नाही. ऑस्ट्रेलियाला विजयासाठी २२३ धावांचे आव्हान दिले आहे.
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मॅथ्यू वेड याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताची सुरुवात अतिशय खराब झाली. अवघ्या 24 धावांवर भारताचे आघाडीचे दोन फलंदाज माघारी परतले. यशस्वी जायस्वाल सहा धावा काढून बाद झाला तर ईशान किशन याला खातेही उघडता आले नाही. दोन विकेट झटपट पडल्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादवने ऋतुराजच्या साथीनेल भारताचा डाव सावरला.
सूर्यकुमार यादव आणि ऋतुराज गायकवाड यांनी तिसऱ्या विकेटसाठी ४७ चेंडूत ५७ धावांची भागीदारी करत डावाला आकार दिला. सूर्यकुमार यादव झंझावती फलंदाजी करत असताना ऋतुराज संयमी खेळत होता. सूर्यकुमार यादवने २९ चेंडूत दोन षटकार आणि पाच चौकारांच्या मदतीने ३९ धावांची महत्वपूर्ण खेळी केली. सूर्याला साथ देणारा ऋतुराज गायकवाड याने नंतर गियर बदलला.
कर्णधार तंबूत परतल्यानंतर ऋतुराज गायकवाडने सुत्रे हातात घेतील. ऋतुराज गायकवाडने तिलक वर्माला साथीला घेत धावसंख्या वेगाने वाढवली. ऋतुराज आणि तिलक वर्मा यांच्यामध्ये शतकी भागिदारी झाली. यामध्ये ऋतुराज गायकवाडचा मोठा होता. ऋतुराज गायकवाड याने ऑस्ट्रेलियाच्या प्रत्येक गोलंदाजाचा खरपूस समाचार घेतला. ऋतुराज गायकवाडने टी २० मधील पहिले शतक ठोकले. ऋतुराजने षटकार मारुन शतक ठोकले. ऋतुराजने ५२ चेंडूत शतकाला गवसणी घातली.
ऋतुराज गायकवाड आणि तिलक वर्मा यांनी ५९ चेंडूत १४१ धावांची अभेद्य भागिदारी केली. यामध्ये ऋतुराज गायकवाडचे योगदान १०१ धावांचे होते. ऋतुराज याने ऑस्ट्रेलियाच्या प्रत्येक गोलंदाजाचा समाचार घेतला. तिलक वर्माने त्याला चांगली साथ दिली. तिलक वर्माने २४ चेंडूत ३१ धावांची खेळी केली. ऋतुराज गायकवाडने ५७ चेंडूत १२३ धावांची खेळी केली. यामध्ये सात षटकार आणि १३ चौकार लगावले. ऋतुराज गायकवाडने अखेरच्या षटकात तीन षटकार आणि दोन चौकार ठोकले. २० व्या षटकात भारताने तीस धावा कुटल्या.