नांदेड : प्रतिनिधी
नांदेड शहर व परिसरात गुन्हेगारांनी पुन्हा डोके वर काढले यातून तीन जणांमध्ये वाद होऊन एकाने दुस-यावर गोळीबार केला. यात एक जण ठार झाला तर अन्य एक गंभीर जखमी झाला. वसरणी येथील जलशुद्धीकरण केंद्राजवळ रविवारी सकाळी ११ वा. ही घटना घडली.
दोन महिन्यापूर्वीच शहरातील गुरुद्वारा परिसरात घडलेल्या गोळीबाराची चर्चा थंडावत असताना आज दि.११ मे रोजी सकाळी पुन्हा एकदा गोळीबाराने नांदेड शहर हादरले. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला आशु पाटील उर्फ कमलेश लिंबापुरे याच्यासह शेख परवेज, तेजासिंग बावरी या तिघांमध्ये किरकोळ कारणावरून वाद सुरू होता. प्रारंभी किरकोळ असलेला हा वाद टोकाला जाऊन यातून कमलेश लिंबापुरे उर्फ आशु पाटील याने शेख परवेज व तेजासिंग बावरी यांच्यावर गोळी झाडली. यात शेख परवेज (वय २५) हा जागीच ठार झाला तर त्याच्यासोबत असलेला तेजासिंग बावरी हा जखमी झाला.
घटनेची माहिती मिळताच ग्रामीण ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांनी घटनास्थळाला भेट दिली असून या गोळीबारात जखमी झालेल्या तेजासिंग बावरी याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.