23.7 C
Latur
Saturday, July 27, 2024
Homeसोलापूरवादळी वाऱ्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील एक हजार ११४ हेक्टरला फटका

वादळी वाऱ्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील एक हजार ११४ हेक्टरला फटका

सोलापूर : अवकाळी वादळी वाऱ्यामुळे जिल्ह्यातील एक हजार ११४ हेक्टरला फटका बसला असून त्यामध्ये १६६७ शेतकरी बाधित झाले आहेत. पंढरपूर तालुक्यातील ८६७ शेतकऱ्यांचे ६३१ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. माढा तालुक्यातील २५५ शेतकऱ्यांचे ११० हेक्टरवरील नुकसान झाले आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील २६० शेतकऱ्यांचे ११० हेक्टरवरील नुकसान झाले आहे. उत्तर सोलापूर तालुक्यातील तीन शेतकऱ्यांचे दोन हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. मंद्रूप अप्पर तहसील कार्यालयाच्या हद्दीतल आठ शेतकऱ्यांचे १०.२० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

करमाळा तालुक्यातील ९५ शेतकऱ्यांचे ६० हेक्टरवरील नुकसान झाले आहे. मोहोळ तालुक्यातील १४५ शेतकऱ्यांचे १७० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. मंगळवेढा तालुक्यातील २४ शेतकऱ्यांचे २०.७० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाला आहे. सोलापूर शहर व जिल्ह्याला अवकाळीच्या पावसाचा नेहमीच तडाखा बसू लागला आहे. सोलापूर शहर व जिल्ह्यात अवकाळी पावसाने वादळी वाऱ्यासह जोरदार हजेरी लावली. या वादळी वाऱ्यात जिल्ह्यातील १६३ घरांची पूर्णता पडझड झाली आहे. पंढरपूर तालुक्यातील १४०, मंगळवेढा तालुक्यातील २१ आणि मोहोळ तालुक्यातील दोन घरांचा त्यामध्ये समावेश आहे. जिल्हा प्रशासनाने संकलित केलेल्या अहवालातील ही माहिती आहे.

जिल्ह्यातील ११०६ घरांची अंशतः पडझड झाली आहे. त्यामध्ये मंगळवेढा तालुक्यातील ३८८, दक्षिण सोलापूर तालुक्यातील २७०, पंढरपूर तालुक्यातील १६२, उत्तर सोलापूर तालुक्यातील ११, बार्शी तालुक्यातील ३०, मंद्रूप अप्पर तहसील कार्यालयाच्या अखत्यारितील ६९, माढा तालुक्यातील ८०, करमाळा तालुक्यातील १५, मोहोळ तालुक्यातील ७५, सांगोला तालुक्यातील सहा घरांची अंशतः पडझड झाली आहे. या अवकाळीच्या तडाख्यात पंढरपूर तालुक्यातील एक व मोहोळ तालुक्यातील एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. वादळी वारे, अवकाळी पावसामुळे मोठ्या १३ जनावरांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये मोहोळ तालुक्यातील पाच, सांगोला तालुक्यातील तीन, मंगळवेढा व दक्षिण सोलापूर तालुक्यातील प्रत्येकी दोन तर बार्शी तालुक्यातील एका मोठ्या जनावराचा समावेश आहे. मोहोळ तालुक्यातील एका लहान जनावराचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात अवकाळी पावसाने थैमान घातले असून त्याचा वीज यंत्रणेला सर्वाधिक फटका बसला आहे. या वादळात जिल्ह्यातील एक हजार २८० खांब कोसळले आहेत. परिणामी २६ वीज उपकेंद्रांना वादळाचा फटका बसला आहे.त्यातील १८ वीज उपकेंद्रांचा वीज पुरवठा ‘महावितरण’च्या वीज कर्मचारी, अभियंते व ठेकेदारांच्या कामगारांनी परिश्रम घेत पूर्ववत केला आहे. अद्याप आठ उपकेंद्रे बंद असून ती काही तासांत पूर्ववत करण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

जिल्ह्यात आठवडाभरापासून वादळ- वाऱ्यासह पाऊस पडत आहे. मोठ-मोठे वृक्ष वीज वाहिन्यांवर उन्मळून पडल्याने वीज यंत्रणा कोलमडत आहे. त्यात २६ मे रोजी झालेल्या वादळी पावसाने अक्षरश: महापारेषण कंपनीचे वीज मनोरेही कवेत घेतले. ‘महावितरण’ची जिल्ह्यातील २६ उपकेंद्रे बंद पडली. दोन हजार ५३ रोहित्रांना देखील वादळाचा फटका बसला असून अनेक ठिकाणी रोहित्रेही जमीनदोस्त झाली आहेत. ‘महावितरण’चे बारामती परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनील पावडे, प्रभारी अधीक्षक अभियंता धर्मराज पेठकर, कार्यकारी अभियंता (प्रशासन) संजयकुमार शिंदे व संबंधित विभागांच्या कार्यकारी अभियंत्यांच्या मार्गदर्शनाखाली विस्कळित वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी मेहनत घेत आहेत. ‘महावितरण’चे ३५० व ठेकेदारांकडील ४०० कामगारांची पथके तयार करण्यात आली असून त्यांना लागणारे विजेचे खांब, रोहित्रे, तारा व इतर साहित्य मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देण्यात आले आहे. दुरुस्तीची मोहीम दिवसरात्र सुरु असून काही तासांतच १८ वीज उपकेंद्रे सुरु करण्यात यश मिळाले आहे. जिथे शक्य आहे तिथे पर्यायी मार्गाने वीजपुरवठा सुरु करण्यात आला आहे.

तांदूळवाडी, रे-नगर, देवडी, अचकदानी, कटफळ, जामगाव, रातंजन व वैराग अशी आठ उपकेंद्रे सुरु होणे बाकी आहे. या उपकेंद्रांना सुरु करण्याचेही प्रयत्‍न सुरु आहेत. तर कामती उपकेंद्रांतील ५ एमव्हीए क्षमतेचे उच्चदाब रोहित्र नादुरुस्त झाले असून तेही बदलण्यात येत आहे. सोलापूर ग्रामीण, पंढरपूर व बार्शी या तीन विभागांना वादळाचा सर्वाधिक फटका बसला आहे. जिल्ह्यात अंदाजे ३३ केव्ही वाहिनीचे ३० तर ११ केव्ही वाहिनीचे ४५० व लघुदाब वाहिनीचे ८०० खांब पडले आहेत. गावठाण, पाणीपुरवठा, रुग्णालये व औद्योगिक वाहिन्यांना सुरु करण्यास सर्वाधिक प्राधान्य दिले जात आहे.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR