मुंबई : प्रतिनिधी
महापालिका निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीवर हरकती आणि सूचना दाखल करण्यासाठी आणखी सहा दिवसांचा कालावधी वाढवण्यात आला आहे. राज्य निवडणूक आयोगाने बुधवारी मतदार यादीशी संबंधित सुधारित कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीवर हरकती आणि सूचना ३ डिसेंबर २०२५ पर्यंत दाखल करता येतील. आधीच्या कार्यक्रमानुसार ही मुदत २७ नोव्हेंबर २०२५ अशी होती.
राज्यात मुंबईसह २९ महापालिकांच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. मात्र, या यादीत मोठ्या प्रमाणात घोळ असून दुबार मतदारांची संख्या लाखोंच्या घरात असल्याची तक्रार शिवसेना ठाकरे गट, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, काँग्रेस आदींनी राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे. त्यामुळे मतदार यादीवर हरकती आणि सूचना दाखल करण्यासाठी १५ दिवसांची मुदत देण्याची मागणी विरोधी पक्षाने केली होती. ही मागणी आयोगाने मान्य केली आहे.
राज्य निवडणूक आयोगाने आज जाहीर केलेल्या मतदार यादीच्या सुधारित कार्यक्रमानुसार प्रारूप मतदार यादीवर दाखल झालेल्या हरकतीवर निर्णय घेऊन प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या अधिप्रमाणित करून प्रसिद्ध करण्याची तारीख १० डिसेंबर २०२५ अशी असेल. १५ डिसेंबर २०२५ रोजी मतदान केंद्राच्या ठिकाणांची यादी प्रसिद्ध करावी लागेल. तर २२ डिसेंबर २०२५ रोजी मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

