नवी दिल्ली : वृत्तसंस्था
केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. स्थानिक बाजारपेठांतील कांद्याचे दर नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले. मात्र, या निर्णयावरून कांदा उत्पादक शेतक-यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
३१ मार्च २०२४ पर्यंत कांदा निर्यातबंदी राहणार असल्याचे परिपत्रक केंद्र सरकारने काढले आहे. याचा मोठा फटका कांदा उत्पादक शेतक-यांना बसणार आहे. दरम्यान, सरकारच्या या निर्णयानंतर शेतक-यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून ठिकठिकाणा आंदोलन सुरु केले आहे. तसेच कांदा व्यापा-यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच सरकारच्या या निर्णयानंतर लासलगाव, मनमाड, नांदगावसह बहुतांश बाजार समित्यात कांद्याचे लिलाव बंद करण्यात आले. त्यातच नाशिकच्या उमराणे येथे कांदा उत्पादक शेतक-यांनी मुंबई-आग्रा महामार्ग रोखला. दिल्लीतील बाजारात स्थानिक विक्रेते ७० ते ८० रुपये किलो दराने कांद्याची विक्री करत आहेत. मात्र, आता निर्यातबंदी केल्याने दरात घसरण होण्याची शक्यता आहे.
आजच्या निर्णयापूर्वी केंद्र सरकारने ऑक्टोबरमध्ये ग्राहकांना दिलासा देण्यासाठी किरकोळ बाजारात २५ रुपये प्रतिकिलो या सवलतीच्या दराने कांदा देण्याचा निर्णय घेतला होता. एकीकडे अवकाळी आणि गारपिटीने बळीराजा होरपळला आहे. शेतक-याला हिवाळी अधिवेशनादरम्यान आर्थिक मदत होईल आणि दिलासा मिळेल, अशी आशा होती. मात्र, केंद्र सरकारच्या या निर्णयाने शेतकरी वर्गात पुन्हा नाराजी पसरली आहे. अनेक ठिकाणी कांदा उत्पादक शेतक-यांची आंदोलने सुरु आहेत.
विधिमंडळातही गदारोळ
केंद्राने धक्कादायक निर्णय घेत शेतक-यांची कोंडी केली आहे. कांदा निर्यातबंदी आणि इथेनॉल बंदीचा मुद्दा आता उपस्थित झाला आहे. तसेच दुधाचा प्रश्नही चांगलाच तापला आहे. त्यामुळे या या सर्व पार्श्वभूमीवर हिवाळी अधिवेशनात विरोधकांनी राज्य सरकारला धारेवर धरत प्रश्नांचा भडिमार केला. यावेळी राष्ट्रवादीचे जयंत पाटील, कॉंग्रेसचे नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांनी प्रश्न उपस्थित केला.
केंद्रीयमंत्री अमित शाह, गोयलांशी चर्चा करणार
दरम्यान, यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी मराठा आरक्षण, शेतकरी किंवा उसाचा प्रश्न या मुद्यांवर चर्चा करण्याची राज्य सरकरची तयारी आहे. यासंदर्भात केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्याशी फोनवरून चर्चा केली. तसेच पियुष गोयल, नितीन गडकरी यांच्याशी चर्चा केली असून त्यांची शनिवारी किंवा रविवारी भेट घेणार आहे. जर मार्ग निघाला नाही तर आम्ही दिल्लीला जाऊन मार्ग काढ, असे म्हटले.