नाशिक : प्रतिनिधी
राज्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसाने सामान्य नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला असला तरी शेतक-यांच्या चिंतेत मात्र भर पाडली आहे. अवकाळी पावसामुळे राज्यात फळबागांबरोबरच कांदा उत्पादक शेतक-यांना देखील अवकाळीचा फटका बसला आहे.कांद्याचे कोठार असलेले लासलगाव आणि आष्टी हे पावसाने चिंब झाल्याने कांदा सडण्यास सुरुवात झाल्याने पुन्हा एकदा उत्पादकांना कांदा रडविणार आहे.
राज्यातल्या अनेक भागात उन्हाळ कांद्याचे पीक मोठ्याप्रमाणात घेतले जाते. या कांद्यावर मिळणा-या पैशांमुळेच खरिपाच्या पिकांसाठी शेतक-यांना तयारी करता येते. मात्र यंदा अवकाळी पावसाने ऐन कांदे काढणीच्या मोसमातच अवकाळी पावसाने थैमान घातल्याने हे कांद्याचे पीक आता पूर्ण वाया गेले आहे. काढून ठेवलेल्या कांद्यांना पाणी लागल्याने तब्बल ६० ते ७० टक्के कांदे सडले आहेत. काढणीला आलेल्या कांद्यांमध्ये देखील पाणी गेल्याने पूर्ण पीक वाया गेले आहे. त्यामुळे आता उत्पादनाचा खर्च देखील निघणार नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
आष्टी तालुक्यात लहान आर्वी, आष्टी, तळेगाव या तीन गावांत मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादन होते. एकरी दीडशे क्विंटल उत्पादन घेतले जाते. या शेतक-यांसाठी हे एक प्रकारचे नगदी पीक ठरते. १५ ते २० फेब्रुवारी दरम्यान लागवड होत असते. मे महिन्यात कापणी होते. आता ती वेळ आली असतानाच पावसाने घात केल्याचे शेतकरी सांगतात. कांदा जागेवर ११ ते १५ रुपये क्विंटल या भावाने विकला जातो. बाहेर बाजारपेठेत अधिक भाव मिळतो. मात्र पावसामुळे कांद्यास मार बसला आणि हा भाव ८ रुपये किलोवर घसरला.
बुरशी लागण्यास सुरुवात
चाळीत साठवलेला कांदा खराब होण्याचे प्रमुख कारण म्हणजे वाढते तापमान आणि आर्द्रता. जाणकार शेतक-यांचे म्हणणे आहे की, अवकाळी पावसामुळे चाळीत ओलावा वाढतो, ज्यामुळे कांद्याला बुरशी लागण्याची शक्यता वाढते. याला प्रतिबंध करण्यासाठी कांदा आत-बाहेर करणे किंवा हवेशीर ठिकाणी ठेवणे आवश्यक आहे, परंतु ही प्रक्रिया अत्यंत खर्चिक आहे.
कांद्याला भाव कमी
कांदा साठवणुकीच्या समस्येने अल्पभूधारक शेतकरी विशेषत: अडचणीत आले आहेत. काही सधन शेतक-यांकडे स्वत:च्या कांदा चाळी असल्या, तरी बहुसंख्य लहान शेतक-यांना भाड्याच्या चाळींवर अवलंबून राहावे लागते. सध्या बाजारात कांद्याची आवक वाढली असली, तरी मागणी कमी असल्याने भाव घसरले आहेत.अशा परिस्थितीत साठवलेला कांदा टिकवायचा कसा आणि विकायचा कधी, या दुहेरी संकटाने शेतकरी हवालदिल झाले आहेत.