मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शुक्रवारी मातोश्रीवर भाजपा आणि संघाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. यावेळी उद्धव ठाकरेंनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, काही नालायक लोक सध्या हिंदुत्वात भेदभाव करत आहेत. आम्ही गर्वाने सांगतो की आम्ही हिंदू आहोत. पण त्यातही काहीजण भेदभाव करत आहेत. अशा लोकांपासून सावध राहण्याची गरज आहे. आम्ही काय केले, कोणाला मदत केली याची मला आठवण करुन द्यायची नाही. १९९२ नंतर मुंबईला शिवसेना आणि शिवसैनिकांनीच वाचवले, असे ते म्हणाले.
ते म्हणाले की, दंगल, पाऊस असे मुंबईवर कोणतेही संकट येतात, तेव्हा बाळासाहेबांनी आम्हाला मदत करण्याची शिकवण दिली आहे. रक्तदान करताना ते रक्त कोणाचे आहे हे आम्ही पाहत नाही. आम्ही कधीच भेदभाव करत नाही. तुम्ही परप्रांतीय, उत्तर भारतीय आहात असा भेदभाव केला नाही. आपण सगळे हिंदू आहोत. भगवा हा भगवाच असतो. श्रीकृष्ण, श्रीराम, भवानीमाता या सर्वांचा भगवा एकच आहे. ‘मन की बात’ विचार करुन केली जाते. पण सर्वांनी ‘दिल की बात’ सांगितली आहे, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.