छत्रपती संभाजीनगर : प्रतिनिधी
मराठा आरक्षणावरून छगन भुजबळ यांनी थेट आक्रमक भूमिका घेत मराठा समाजाला ओबीसीमधून सरसकट आरक्षण देण्यास विरोध केला. छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकार परिषदेत त्यांनी आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार केला. त्यानंतर बीडमध्येदेखील थेट आपल्याच सरकारच्या विरोधात शड्डू ठोकत ओबीसींसाठी आक्रमक भूमिका घेतली. त्यामुळे राज्यात ओबीसी-मराठा आरक्षणाचा वाद पेटण्याची चिन्हे आहेत.
मराठा आरक्षणाला आम्ही कधीच विरोध केला नाही. मात्र, कोणत्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला वेगळे आरक्षण देण्याची आमची मागणी आहे. ओबीसीमध्ये अनेक छोट्या-छोट्या जाती आहेत. त्यामुळे मराठा समाजाला ओबीसीमध्ये घेतल्यास कोणालाही याचा फायदा होणार नाही. आमची जी भूमिका आहे, तीच शरद पवार, अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सर्वच पक्षाची आहे. ओबीसी समाजाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी सर्वांची आहे. त्यामुळे त्याच पद्धतीने आरक्षण मिळाले पाहिजे, असेही ते म्हणाले.
कुणबींना आरक्षण मिळावे, पण सरसकट मराठ्यांना नको. तुम्ही मतांसाठी हे करत असाल तर ओबीसींची मते तुम्हाला नको का, मराठे म्हणतात भुजबळांना मतदान देऊ नका, मग ओबीसींनीही तसा विचार केला तर, ओबीसी आरक्षण संपविण्याचा घाट घातला जात आहे. यात अनेकांचा समावेश आहे, असे सांगतानाच जरांगे पाटील यांचे उपोषण सोडण्यासाठी एक न्यायमूर्ती जात असतील तर आम्हाला काय न्याय मिळणार, मंत्री जातात ते ठीक. पण न्यायमूर्ती त्यांना सर म्हणतात, असे भुजबळ म्हणाले आणि याबद्दल तीव्र नापसंती व्यक्त केली.
सरकारविरोधातच शड्डू
ज्या समितीचे प्रमुख जालन्यात जाऊन मनोज जरांगेंना सर सर म्हणतात, त्यांच्यावर आमचा विश्वास नाही, अशी भूमिका घेत राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्याच सरकारविरोधात शड्डू ठोकला. मराठा आरक्षणाला विरोध नाही, पण त्यांना ओबीसीमधून आरक्षण नको, असेही ते म्हणाले.
हा तर आरक्षण संपविण्याचा घाट
तेलंगणा निवडणूक आहे, म्हणून पुरावे मिळत नाही असे म्हणता. मग २ दिवसांत कसे मिळाले, १३ हजार पुरावे मिळाले म्हणता. मग सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणे चुकीचे आहे. हा ओबीसी आरक्षण संपविण्याचा घाट सुरु आहे. मंत्रालयापासून खालपर्यंत सगळीकडे हे सुरू आहे. त्यामुळे याविरोधात आवाज उठविणे गरजेचे आहे, असे भुजबळ म्हणाले.
बीडमधील हिंसाचार पूर्वनियोजित कट
बीडमधील हिंसाचार हा पूर्वनियोजित कट होता आणि राज्याच्या गुप्तचर खात्याचे ते अपयश असल्याचा दावा राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी केला. जयदत्त क्षीरसागर हे फक्त ओबीसी समाजाचे असल्याने त्यांच्या घरावर हल्ला करण्यात आला असल्याचेही ते म्हणाले.
नोंद सापडलेल्यांनाच आरक्षण द्यायला हवे
ज्याची कुणबी नोंद सापडली आहे, त्यालाच आरक्षण मिळावे, त्याच्या नातेवाईकांना नको, अशी भूमिकाही त्यांनी घेतली. राज्याच्या एका मंत्र्यानेच राज्य सरकारने नेमलेल्या समितीला विरोध केल्यामुळे अंतर्गत वाद चव्हाट्यावर येण्याची शक्यता आहे.
जे हक्काचे आहे त्याचीच मागणी
जे मराठा समाजाच्या हक्काचे आहे, तेच आम्ही मागत आहोत. मराठ्यांना कुणबी आरक्षण दिल्याने ओबीसींचे आरक्षण कसे संपणार, असा सवाल उपस्थित करीत मनोज जरांगे यांनी न्यायाधीश न्यायदानाचे काम करतात. त्यांनी जीव वाचवण्याचे काम केले. जीव वाचवण्यासाठी तुम्ही तर येत नाही, तुम्ही तर जीव घ्यायला निघाला. पण जे आलेत त्यांच्यावर असे बोलत असाल तर काय बोलणार, असे म्हटले. यावेळी लाठीहल्ल्याचीही चौकशी होऊन जाऊ द्या, असे आव्हान त्यांनी दिले.