22.3 C
Latur
Sunday, September 29, 2024
Homeमहाराष्ट्र२८८ जागांवर संघटनात्मक बांधणी

२८८ जागांवर संघटनात्मक बांधणी

विधानसभेतही मेरिटनुसारच जागावाटप व्हावे : पटोले

नागपूर : प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले असले तरी यापेक्षाही अधिक यश मिळू शकले असते. आता विधानसभा निवडणुकीत आघाडी म्हणून लढताना मेरिटनुसारच जागा वाटप झाले तर चांगला निकाल लागू शकतो. काँग्रेस पक्ष महाविकास आघाडी म्हणूनच विधानसभा निवडणूक लढवणार असून राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघातील संघटनात्मक बांधणीवर भर दिला जाणार आहे. राज्यातील भाजपाचे भ्रष्ट सरकार सत्तेबाहेर काढणे हाच उद्देश आहे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले.

नागपूरमध्ये प्रसार माध्यमांशी ते बोलत होते. लोकसभा निवडणुकीवेळी काँग्रेसने राज्यातील सर्व ४८ जागांवर संघटनात्मक बांधणी केली होती, त्याचा फायदा काँग्रेस पक्षाबरोबरच महाविकास आघाडीला झाला. आताही विधान सभेसाठी २८८ जागांवर पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. एकत्रित लढायचे असेल तरी संघटनात्मक तयारी करायला लागते. काँग्रेसने सर्व जागांवर तयारी केली तर त्याचा फायदा मित्रपक्षांनाही होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपावेळी मेरिटचा विचार केला असता तर आणखी चांगले परिणाम दिसले असते.

पावसाळी अधिवेशनात सरकारला जाब विचारू
राज्यातील भाजपा सरकारला सत्तेतून बाहेर काढणे हेच महत्वाचे आहे. महायुती सरकारने शेतक-यांच्या नावाने योजना करून कोट्यवधी रुपये लुटले आहेत. डीबीटी योजनेतून टेंडर न काढता मुख्यमंत्र्यांनी खरेदी करून लूट केली. तसेच बांधकाम विभागाच्या जागा तारण ठेवून त्यावर कर्ज काढले आहे. यासंबंधीचा जाब अधिवेशनात विचारू, असे पटोले म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR