22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeपरभणीपरभणीत पाच दिवशीय महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन

परभणीत पाच दिवशीय महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन

परभणी : उत्सव नगरी म्हणून ओळखल्या जाणा-या परभणीत ७ ते ११ फेबु्रवारी दरम्यान महासंस्कृती महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात मनोरंजनात्मक व सांस्कृतिक कार्यक्रमांमधून आंतरराष्ट्रीय किर्तीच्या कलावंतांपासून स्थानिक पातळीवरील कलावंत मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. दुर्मिळ व लुप्त होत असणा-या संस्कृती व कलाप्रकाराच्या संवर्धनासाठी हा उपक्रम शासनाचे महत्वाकांक्षी पाऊल ठरणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिली.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत विविध नाविण्यपूर्ण उपक्रम व कार्यक्रमांचे पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग मंत्रालय मुंबई यांच्यावतीने संपूर्ण राज्यात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून आयोजन केले जात आहे. या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी व जिल्हाप्रशासनाच्या वतीने दि. ७ ते ११ फेब्रुवारी दरम्यान पाच दिवसीय भव्य अशा महासंस्कृती महोत्सवाचे विष्णू जिनींग येथे आयोजन केले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन क्रीडा व युवक कल्याण, बंदरे तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते तर जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींच्या मुख्य उपस्थितीत बुधवार, दि.७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजता होणार आहे. परभणीकरांना यानिमित्ताने अविस्मरणीय सांस्कृतिक पर्वणी देण्याचा मानस असलेल्या जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी या सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी समस्त परभणीकरानी पाचही दिवस सहकुटुंब उपस्थित रहावे, असे आवाहन केले आहे.

या महोत्सवात बुधवारी अशोक हांडे यांचा मराठीबाणा सादर होणार आहे. देश-विदेशातून २२००च्या वर प्रयोग सादर झालेला मराठी बाणा मराठवाड्यात मात्र प्रथमच सादर होत आहे. गुरुवारी महाराष्ट्र दर्शन कार्यक्रम असेल. यावेळी विनोदी अभिनेते भारत गणेशपुरे यांची मुख्य उपस्थिती असणार आहे. गोंधळ महर्षी स्व. राजारामबापु कदम गोंधळी यांचे सुपूत्र रामदास कदम व संच यांचा कलाविष्काराचा कार्यक्रम सादर होणार असून यामध्ये महागायक पं. यज्ञेश्‍वर लिंबेकर, शाहिर प्रकाश कांबळे, परभणी कोरिओग्राफर असोसिएशनचे सदस्य गुरुमाऊली कलामंच यांचा सहभाग असणार आहे. दुस-या सत्रात भारुडरत्न शेखर निरंजन भाकरे यांचे भारुड होणार आहे. महोत्सवात ९ फेब्रुवारी रोजी दुर्मिळ व लुप्त होत चाललेल्या लोककला व संस्कृतिचा अनोखा अविष्कार कलासंगम हा कार्यक्रम सादर होणार आहे. यादिवशी डॉ. लक्ष्मण देशपांडेच्या व-हाड निघालंय लंडनला या अजरामर एकपात्री प्रयोगाला ज्यांनी पुन्हा रसिकांसमोर सक्षम अभिनयातून आणले असे मराठवाड्याचे भूमिपुत्र संदिप पाठक हे विशेष अतिथी असणार आहेत.

शनिवारी लावण्यरंग कार्यक्रमात मुंबई विद्यापीठाचे विभाग लोककला विभागप्रमुख डॉ. गणेश चंदनशिवे यांचे सायंकाळी ६ ते ७.३० या वेळेत प्रबोधन तसेच सर्व कुटूंबाने एकत्र बसून आनंद घ्यावा असा घरंदाज लावणीच्या अविष्काराचा लावण्यरंग हा कार्यक्रम सायंकाळी ७.३०. ते १० या वेळेत सादर होणार आहे. त्यात स्मृति बडदे, ऐश्‍वर्या बडदे व संच सहभागी होणार आहेत. रविवारी सायंकाळी ६ ते ८ या वेळेत स्वर जल्लोष हा देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम सादर होणार असून यावेळी गायक राहुल सक्सेना, समी सौदागर, प्रांजल बोधक, पवन पागोटे, लक्ष्मी लहाणे, बालविद्या मंदिरचा संघ व आयुष डान्स अकॅडमी परभणीचा संघ सहभागी होणार आहे. रात्री ८ ते १० या वेळेत कवी संमेलन होणार असून त्यात इंद्रजित भालेराव, प्रभाकर साळेगावकर, रेणू पाचपोर, नारायण पुरी, केशव खटींग, रविशंकर झिंगरे, संतोष नारायणकर, बापू दासरी व मधूरा उमरीकर हे सहभागी होणार आहेत.

कला व साहित्याच्या क्षेत्रात आपल्या प्रभावी कार्यातून आणि महत्वपूर्ण योगदानातून ज्यांनी परभणीचा लौकिक सर्वदूर वाढवला अशा मान्यवरांचा सन्मान व ऋणनिर्देश करण्यात येईल. ज्यामधे सुरमणी पं. डॉ. कमलाकर परळीकर (संगीत), रोहित नागभिडे (संगीत), प्रा.इंद्रजित भालेराव, नाट्य अभिनेते किशोर पूराणिक, डॉ. आसाराम लोमटे (साहित्य), पं. यज्ञेश्वर लिंबेकर यांचा समावेश असेल. महोत्सवाच्या प्रत्येक दिवशी कूपन्स वाटप करून त्याद्वारे लकी ड्रॉ काढण्यात येईल. रोज किमान पाच भाग्यवान विजेते पाहुण्याच्या हस्ते आकर्षक भेट वस्तू दिल्या जाणार आहेत. विद्यार्थ्यांसाठी शिव छत्रपतींच्या जीवनमुल्यांचा, राज्यकारभारातील वैशिष्ठ्यांचा, गडकिल्ल्यांचा परिचय देणारी भव्य प्रदर्शनी हे या महोत्सवातील विशेष आकर्षण ठरणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR