मुंबई : भांडुपचा भोंगा दिल्लीवरून कर्णकर्कश आवाजात एखाद्या मानसिक रोग्यासारखा वाजला. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांच्याबद्दल त्याने तारतम्य बाळगून बोलावे, नाहीतर ठाण्याच्या मेंटल हॉस्पिटलमध्ये एक बेड भविष्यात बुक करू, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी केली.
लोकसभेनंतर राज्यसभेत वक्फ दुरुस्ती विधेयक मंजूर करण्यात आले. राज्यसभेतील चर्चेवेळी राष्ट्रवादीचे काँग्रेस अजित पवार गटाचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी, संजय राऊतांनी रंग बदलू नये, असा टोमणा मारला. प्रफुल्ल पटेल यांच्या भाषणावर खासदार संजय राऊत यांनी जोरदार प्रहार केला. तुम्हाला दाऊद इब्राहीमचा हिरवा रंग लागला आहे. इतिहास काढला तर प्रफुल्ल पटेलांना महाराष्ट्र सोडून जायला लागेल, असे संजय राऊत म्हणाले. यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसअजित पवार गटाच्या नेत्यांनी संजय राऊतांनी पलटवार करताना निशाणा साधला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांनी वक्फ बोर्डाच्या विधेयकावर भाषण करताना शिवसेनेचे जाज्वल्य हिंदूत्व जे शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात होते, याची आठवण करून दिली आणि त्या भाषणाच्या मिरच्या इतक्या झोंबल्या की, हा भोंगा दिल्लीवरून कर्कश आणि खालच्या पातळीवर येऊन वाजला, या शब्दांत आनंद परांजपे यांनी हल्लाबोल केला.