‘मराठी असे आमुची मायबोली’ असे आपण मोठ्या अभिमानाने म्हणतो, बोलतो परंतु पुढे काय? ‘बोलाचाच भात अन् बोलाचीच कढी’ दुसरे काय! मराठी ही केवळ भाषा नाही तर संस्कृतीही आहे. महाराष्ट्र धर्म मानणारा प्रत्येक व्यक्ती हा मराठी आहे. आज मराठी माणूस हा सातासमुद्रापार पोहोचला आहे. मात्र मराठी भाषेची गती ही गोगल गायीच्या गतीने सुरू आहे. ही वस्तुस्थिती नाकारून कसे चालेल? म्हणून आता मराठीचा जगभरात प्रसार करण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. ‘माझा मराठीचि बोलू कवतिके’ असे संत ज्ञानेश्वरांनी अभिमानाने सांगितले होते. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, लोकमान्य टिळक, आगरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि इतर समाजसुधारकांनी मराठीत जनमानसाचे प्रबोधन केले. नवी मुंबईतील वाशी येथे विश्व मराठी संमेलन पार पडले. त्यात मराठी भाषेचा प्रचार व प्रसार करण्यासंबंधी विचारमंथन झाले. भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत काळात आपण सर्वांनी मिळून आपल्या अमृतवाणी मराठीचा जगभरात प्रसार करण्यासाठी सामूहिक प्रयत्न करूया, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले. प्रत्येक मराठी भाषिक माणसाने समोर येणारी व्यक्ती मग ती कोणत्याही भाषेचा पुरस्कर्ती असो, तिच्याशी मराठी भाषेतूनच संवाद साधला पाहिजे तसेच राज्यातील सर्व शाळांमध्ये पहिलीपासून दहावीपर्यंत मराठी भाषा सक्तीची करावी, अशी विनंती मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना केली.
हिंदी ही फक्त केंद्र आणि राज्य यामध्ये संवाद साधण्यासाठीची प्रशासकीय मान्यताप्राप्त भाषा असून ती राष्ट्रीय भाषा नसल्याचे गुजरात हायकोर्टाच्या निकालाचा हवाला देत अधोरेखित केले. जर पंतप्रधान आपल्या स्व-राज्याची भाषा, संस्कृती आंतरराष्ट्रीय पाहुण्यांना दाखवून त्याचा प्रचार-प्रसार करण्यासाठी प्रयत्नशील असतील तर आपण का मागे पडायचे, असा सवालही ठाकरे यांनी उपस्थित केला. पंतप्रधान मोदी हे त्यांचे स्वत:चे राज्य आणि भाषेवरील प्रेम लपवू शकत नसतील तर तुम्ही-आम्ही ते का लपवावे, असा रोखठोक सवाल ठाकरे यांनी केला. मराठी भाषा ही आपली संस्कृती, परंपरा आणि इतिहास आहे. विश्व मराठी संमेलनाच्या माध्यमातून जगभरातील मराठी माणसांना एकत्रित करता आले. म्हणूनच मराठी भाषा सर्वांना एकत्रित ठेवणारा समान धागा आहे. संत ज्ञानेश्वरांनी पसायदानातून मराठी भाषेचे महत्त्व अधोरेखित केले आहे. विविध परिसंवाद, नाट्यसंमेलन, साहित्य संमेलन अशा विविध माध्यमांतून ‘माय मराठी’चा गजर सुरू असतो. मातृभाषेतून शिक्षण ही आज काळाची गरज आहे. महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे, जिथे इंजिनीअरिंगचे शिक्षण मातृभाषा मराठीतून शिकविण्याचे धोरण स्वीकारले आहे. प्रत्येक जिल्ह्याला मराठी भाषेचे काम करण्यासाठी निधीची तरतूद करून दिली जाणार आहे.
विविध उपक्रम, कार्यक्रमांमधून मराठी भाषा संवर्धनाचे काम केले जाणार आहे. मराठी मातीत वैश्विकता आहे. संत ज्ञानेश्वरांनी सांगितलेला धर्म म्हणजेच महाराष्ट्र धर्म. पसायदानाच्या माध्यमातून सर्वांच्या कल्याणाचा विचार त्यांनी मांडला. मराठी भाषा सनातनी आहे, शाश्वत आहे. मराठी भाषा जगातील एक समृद्ध भाषा आहे, तिच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. या भाषेकडे पूर्वजांचा हजारो वर्षांच्या विचारांचा ठेवा आहे, हा ठेवा पुढच्या पिढीला देणे ही काळाची गरज आहे. मराठी भाषा ही ज्ञानभाषा आहेच परंतु आजच्या काळातील ज्ञानभाषा म्हणून ती परिवर्तित व्हायला हवी. अन्य देश आपापल्या भाषेचा आग्रह धरतात, अभिमान बाळगतात, आपल्याकडेही तसे होणे आवश्यक आहे. मराठी भाषा फक्त घरात बाहेर बोलण्यापुरती राहून चालणार नाही. मराठी भाषा ही व्यवसाय उपलब्ध करून देणारी, जीवन सार्थकी लावणारी झाली पाहिजे. यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज आहे.
शासनाच्या उच्च स्तरीय पातळीवरही याची दखल घेतली गेली पाहिजे. मराठीला अभिजात दर्जा देण्याची मागणी जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी केली होती. मराठीच्या अभिजात दर्जाबद्दल संशोधन करून तसा अहवाल केंद्र सरकारला देण्यासाठी २०१२ साली प्रा. रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती. समितीने आपला अहवाल २०१३ मध्ये प्रकाशितही केला पण घोडं कुठं पेंड खाल्लं कुणास ठाऊक! भारतात सध्या तामिळ, संस्कृत, कन्नड, तेलुगू, मल्याळम आणि ओडिया अशा सहा भाषांना अभिजात दर्जा मिळाला आहे. यात मराठी भाषेला स्थान कधी मिळणार? मराठी भाषासंवर्धन पंधरवडाअंतर्गत महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून, परदेशांतूनही विविध प्रकारे उपक्रम होत आहेत. तरीही मराठी भाषेला अभिजात दर्जा का दिला जात नाही? कदाचित राजकीय प्रयत्न कमी पडत असावेत अथवा त्यांच्यात ती धमक नसावी. मध्यंतरी अभिजात दर्जाबाबत न्यायालयातही काही याचिका दाखल करण्यात आल्या होत्या.
परंतु न्यायालयाने तो निर्णय तज्ज्ञांच्या समितीवर सोपविला होता. मराठी भाषेचा प्रचार, प्रसार या उद्दिष्टांसह रोजगाराभिमुख उपक्रमांतून तरुण पिढीला आकर्षित करावे लागेल. मराठी वाचनसंस्कृती जपण्यासाठी सर्वांनी मराठीतील साहित्य स्वयंस्फूर्तीने वाचणे, पुस्तक विकत घेऊन वाचणे, इतरांना भेट देणे अपेक्षित आहे. वाचाल तर वाचाल! मराठी भाषेची वैश्विक व्याप्ती वाढविण्यासाठी विश्व मराठी साहित्य संमेलन भरविले जाते. त्याचप्रमाणे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने घेतली जातात. त्यासोबतच छोटी-मोठी संमेलनेही होतात. मात्र मायबोलीची व्यथा काही संपत नाही, दूर होत नाही. सध्या संकुचित विचारधारेच्या माणसांना सत्ताबळ प्राप्त झाले आहे. त्यामुळे साहित्यासह माणसांचीही फाळणी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. याकडे वेळीच गांभीर्याने पाहावे लागेल अन्यथा सार्वत्रिक कंगालीकरणाचा मोठा धोका उद्भवू शकतो. त्या दृष्टीने साहित्य आणि समाजप्रबोधन आवश्यक आहे.