19.4 C
Latur
Monday, October 13, 2025
Homeमहाराष्ट्रभाजप-शिवसेनेचे ‘पैसा फेक तमाशा देख’ घोषवाक्य

भाजप-शिवसेनेचे ‘पैसा फेक तमाशा देख’ घोषवाक्य

हर्षवर्धन सपकाळ यांचा हल्लाबोल

उल्हासनगर : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते उल्हासनगर कॅम्प ३ येथील नव्याने बांधलेल्या गांधी भवन कार्यालय व सभागृहाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले. या वेळी सपकाळ यांनी भाजपा-शिवसेना महायुतीवर तीव्र निशाणा साधत ‘पैसा फेक तमाशा देख’ हेच त्यांचे आगामी निवडणुकीचे घोषवाक्य असल्याचे सांगितले. तसेच दिवाळी नंतर भ्रष्टाचा-यांच्या विरोधात बोंबा मार आंदोलन करणार असल्याचे सकपाळ यांनी जाहीर केले.

हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, काँग्रेस म्हणजे सकाळचे सत्य होणारे गोड स्वप्न आहे. या देशाला काँग्रेसने घडवले आणि उल्हासनगर शहराला बसवले. मात्र, युती सरकारने शहराचे खड्डयात रूपांतर केले आहे. उल्हासनगर महापालिका भ्रष्टाचाराने बरबटली असून अंध-अपंगांच्या छड्यांवरही या सत्ताधा-यांनी डोळा ठेवला आहे. जे अंध-अपंगांना सोडत नाहीत, ते नागरिकांना काय सोडतील ? या कार्यक्रमात उल्हासनगर काँग्रेस अध्यक्ष रोहित साळवे, ब्लॉक अध्यक्ष नानिक आहुजा, किशोर धडके, सुनील बेहरानी, प्रवक्ता आसाराम टाक यांच्या प्रयत्नाने गांधी भवनाची पुनर्निर्मिती पूर्ण झाली. उद्घाटनानंतर काँग्रेसतर्फे भाजप-शिवसेना प्रशासकीय राजवटीतील भ्रष्टाचाराचा लेखाजोखा प्रसिद्ध करण्यात आला.

या अहवालात दिव्यांगांच्या छडी विक्रीतील घोटाळा, टीडीआर वाटपातील गैरव्यवहार, कर विभागातील सवलतीतील भ्रष्टाचार, कोणार्क कंपनीच्या कचरा आणि पाणीपुरवठा ठेक्यांतील अनियमितता, तसेच शहाड महानगरपालिका रुग्णालयातील ठेक्यांतील गैरप्रकार उघड करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांनी विरोधकांवर टीका करताना म्हटले, उल्हासनगर भाजपा आज ठेकेदारांची टोळी बनली आहे. प्रशासनावर त्यांचा अंकुश नाही, त्यामुळे नागरिकांच्या मूलभूत समस्या वाढल्या आहेत. काँग्रेस कार्यकर्ते आता या भ्रष्ट कारभाराचा लेखाजोखा जनतेपर्यंत पोहोचवतील.

याप्रसंगी प्रदेश काँग्रेस सरचिटणीस अ‍ॅड. गणेश पाटील, प्रदेश उपाध्यक्ष राणी अग्रवाल, उल्हासनगर प्रभारी नवीन सिंह, कल्याण अध्यक्ष सचिन पोटे, अंबरनाथ अध्यक्ष प्रदीप पाटील, माजी नगरसेविका अंजली साळवे, डॉ. हितेश सचवणी, पवन मिरानी, शंकर आहुजा, अजीज खान, विशाल सोनवणे आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR