कराची : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान यांच्यातील संघर्ष वाढला आहे. त्यात पाकिस्तानी नौदल प्रमुखाने भारताविरोधात चिथावणीखोर विधान केले आहे. आता आपल्याला स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली आहे. आपल्या लोकांना खूप अपेक्षा आहेत. आता देशासाठी काहीतरी करण्याची वेळ आली आहे असे विधान पाकिस्तानी नौदल प्रमुखाने जवानांसमोर केले आहे. पाकिस्तानी नौदल प्रमुख नावेद अशरफ यांनी भारताविरोधात हे विधान केले आहे.
पाकिस्तानी नौदल प्रमुख म्हणाले की, आपल्याला युद्धासाठी तयार राहायचे आहे. देशासाठी स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली आहे. आपल्या देशातील लोकांना आपल्याकडून अपेक्षा आहेत. त्यामुळे तयार राहा असे त्यांनी जवानांना संबोधित करताना म्हटले आहे. नौदल प्रमुखाचे हे विधान थेट युद्धाच्या तयारीचे संकेत मानले जात आहेत. पाकिस्तानी नौदल प्रमुखाचे हे विधान जम्मू काश्मीरातील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतासोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आले आहे.
पाकिस्तानी नौदल प्रमुख नावेद अशरफ यांच्याशिवाय अनेक पाक नेत्यांनी भारताविरोधात वक्तव्ये सुरूच ठेवली आहेत. या यादीत संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ, परराष्ट्र मंत्री इशाक डार, माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो, रेल्वे मंत्री हनीफ अब्बासी यांचा समावेश आहे. भारताच्या कुठल्याही कारवाईला चोख प्रत्युत्तर देऊ. आमचे सैन्य युद्धाला तयार आहे असे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी म्हटले आहे. तर बिलावल भुट्टोने सिंधु नदीत पाण्याऐवजी रक्ताचे पाट वाहतील असे विधान केले.
पाकिस्तानी नेत्यांकडून भारताला अणुहल्ल्याची धमकीही दिली जात आहे.
दरम्यान, पहलगाम दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला. या हल्ल्यात लश्कर ए तोयबाचा हात असल्याचे समोर आले. पाकिस्तानी करक च्या मदतीने या दहशतवादी संघटनेने पर्यटकांवर हल्ला केल्याचा आरोप आहे. या हल्ल्याची चौकशी करताना एनआयएला अनेक महत्त्वाचे पुरावे मिळालेत त्यात पाकिस्तानी कनेक्शन असल्याचे उघड झाले. या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कठोर पावले उचलून सिंधु जल कराराला स्थगिती दिली आहे. इतकेच नाही पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द करून त्यांना देश सोडण्याचे आदेश दिले. पाकिस्तानसोबत व्यापारावर बंदी आणली. पाक राजदूतांना देश सोडायला सांगितले आहे.