इस्लामाबाद : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव चांगलाच वाढला आहे. भारताकडून कधीही हल्ला होण्याची भीती पाकला आहे. या हल्ल्याला सडेतोड उत्तर देण्याची भाषा पाक करत असून तशीही तयारी सुरू केल्याचे भासवले जात आहे. आता पाकिस्तानचे राष्ट्रपतीही सक्रीय आले असून त्यांनी मोठा निर्णय घेतला.
पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांनी संसदेचे आपत्कालीन अधिवेशन बोलावले आहे. हे अधिवेशन सोमवार दि. ५ मे रोजी सायंकाळी पाच वाजता होणार आहे. दोन्ही देशांमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर या अधिवेशनामध्ये पाकिस्तानकडून मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अधिवेशनात सरकारकडून भारताविरोधातील आपली भूमिका स्पष्ट करून इतर खासदारांची मते जाणून घेतली जाऊ शकतात.
भारत आणि पाकिस्तानमधील बिघडलेल्या संबंधांवर प्रामुख्याने या अधिवेशनात चर्चा होईल. त्याचप्रमाणे भारताने रद्द केलेला सिंधू जल करार तसेच इतर प्रमुख्य मुद्यांवर अधिवेशनात लक्ष केंद्रीत केले जाऊ शकते. पाकिस्तानी मीडियानुसार, पाकिस्तानकडून भारताचा निषेध करणारा ठराव संसदेत मांडला जाऊ शकतो. भारताकडून सुरू असलेल्या कारवाईचा निषेध याद्वारे करून जगाचे लक्ष त्याकडे वेधण्याचा प्रयत्न असेल.
पर्यटकांवर झालेला मागील काही वर्षांतील हा सर्वात मोठा हल्ला असल्याने भारताने त्याची गंभीरपणे दखल घेतली आहे. सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईकपेक्षीही मोठी कारवाई भारताकडून केली जाऊ शकतो. पाकला अद्दल घडविण्याची तयारी भारताकडून केली जात आहे. दिल्लीत बैठकांचे सत्र सुरू आहे. तिन्ही दलाचे प्रमुख दिल्लीत तळ ठोकून आहेत. पंतप्रधानांसह संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, सुरक्षा सल्लागार यांच्यावर वरिष्ठ अधिका-यांमध्ये सातत्याने बैठका होत असल्याने पाकिस्तान चांगलेच घाबरले आहे.
भारतातही विशेष अधिवेशनाची मागणी
काँग्रेसचे नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून संसदेच्या दोन्ही सभागृहांचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केली आहे. पहलगाम हल्ल्याच्या निषेध तसेच आपण एकत्रित असल्याचा संदेश देण्यासाठी हे अधिवेशन बोलवावे असे राहुल यांनी पत्रात म्हटले आहे. मात्र, अद्याप या मागणीवर कोणताही निर्णय झालेला नाही.