24.3 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeअंतरराष्ट्रीयपाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली झरदारी घेणार नाहीत वेतन

पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली झरदारी घेणार नाहीत वेतन

देशातील आर्थिक संकट पाहता घेतला निर्णय

कराची : पाकिस्तानचे नवनिर्वाचित राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांनी आपले वेतन घेणार नसल्याचे जाहीर केले आहे. राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांनी आपल्या देशाची वाईट स्थिती पाहता हा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, पाकिस्तान कर्जाच्या ओझ्याखाली दबला आहे. अशा परिस्थितीत नवनिर्वाचित राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांनी पाकिस्तानमधील आव्हानात्मक आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन राष्ट्रपतिपदाच्या काळात कोणतेही वेतन घेणार नसल्याचे जाहीर केले आहे.

राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांनी वेतन न घेतल्याने पाकिस्तानला आर्थिक संकटातून वाचवता येणार नाही. पाकिस्तान सध्या मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. महागाईचा मोठा सामना या देशाला करावा लागत आहे. दिवसेंदिवस पाकिस्तानवर असलेला कर्जाचा बोजा वाढत आहे. पाकिस्तानचे विदेशी कर्ज गेल्या वर्षी एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत १.२ अब्ज डॉलरने वाढून ८६.३५अब्ज डॉलर होते. ज्यामध्ये जागतिक बँक आणि चीनचा सर्वाधिक वाटा होता.

६८ वर्षीय आसिफ अली झरदारी यांनी गेल्या रविवारी १४ वे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. आसिफ अली झरदारी यांचा पक्ष पीपीपीने ‘एक्स’ वर लिहिले आहे की, राष्ट्रपतींनी विवेकपूर्ण आर्थिक व्यवस्थापनास प्रोत्साहन देण्याचे आणि राष्ट्रीय महसुलावर भार न टाकण्याचा निर्णय घेतला आहे. तर राष्ट्रपतींच्या सचिवालय प्रेस विंगने सांगितले की, राष्ट्रीय महसुलावर बोजा पडू नये म्हणून राष्ट्रपतींनी वेतन न घेण्याचा निर्णय घेतला आहे.

पाकिस्तानचे गृहमंत्रीही घेणार नाहीत वेतन
पाकिस्तान पीपल्स पार्टीचे (पीपीपी) सह-अध्यक्ष आसिफ अली झरदारी यांनी रविवारी इस्लामाबादमधील ऐवान-ए-सदर येथे आयोजित समारंभात दुस-यांदा देशाचे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. याशिवाय, आसिफ अली झरदारींच्या पावलावर पाऊल ठेवत गृहमंत्री मोहसीन नक्वी यांनीही देशासमोरील आर्थिक आव्हानांचे कारण देत वेतन न घेण्याचा निर्णय घेतला आहे.

दुस-यांदा बनले पाकिस्तानचे राष्ट्रपती
आसिफ अली झरदारी दुस-यांदा पाकिस्तानचे राष्ट्रपती बनले आहेत. यापूर्वी २००८ ते २०१३ दरम्यान त्यांनी पाकिस्तानचे ११ वे राष्ट्रपती म्हणून काम पाहिले होते. लोकशाही पद्धतीने निवडून आलेले ते पाकिस्तानचे पहिले राष्ट्रपती होते आणि त्यांनी त्यांचा कार्यकाळ यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर पुढील राष्ट्रपतींना पदभार सोपवला होता. बेनझीर भुट्टो सरकारमध्ये त्यांनी अनेक महत्त्वाच्या भूमिका बजावल्या. मात्र, सरकार पडल्यानंतर त्यांच्यावर अनेक गंभीर आरोप झाले आणि त्यांना अटकही झाली होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR