बंगळूरू : पाकिस्तान संघाने वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत शनिवारी न्यूझीलंडवर डीएलएस नियमानुसार २१ धावांनी विजय मिळवला. पाकिस्तानला हा सामना जिंकणे महत्त्वाचे होते, कारण आजची हार त्यांना स्पर्धेबाहेर फेकणारी ठरली असती. समोर ४०० धावा असूनही फखर जमानने आक्रमक खेळी केली आणि त्याला कर्णधार बाबर आजमची साथ मिळाली.
४०२ धावांचा डोंगर समोर असताना सलामीवीर अब्दुल्लाह शफीक (४) लगेच माघारी परतला. पण, फखर जमान आणि बाबर आजम यांनी वादळी खेळी केली. फखरने तर ६३ चेंडूंत ९ षटकार व ६ चौकार खेचून शतक पूर्ण केले आणि पाकिस्तानकडून वर्ल्ड कपमधील हे सर्वात वेगवान शतक ठरले. पावसाचे सावट लक्षात घेऊन पाकिस्तानने आक्रमक खेळ केला आणि २१.३ षटकांनंतर पाऊस आलाच. मात्र, पाकिस्तानने १ बाद १६० धावा केल्या होत्या आणि ऊरछ नुसार पाकिस्तानचा संघ १० धावांनी पुढे होता. पावसामुळे सामन्यातील ९ षटकं कमी करण्याचा निर्णय घेतला गेला अन पाकिस्तानसमोर सुधारित लक्ष्य ठेवले गेले. पुन्हा सुरु झालेल्या सामन्यात बाबरने चौकार खेचून अर्धशतक पूर्ण केले.
पाकिस्तानसमोर ४१ षटकांत ३४२ धावांचे सुधारित लक्ष्य ठेवले गेले आणि त्यांना आता १९.३ षटकांत १८२ धावा करायच्या होत्या. व्यत्ययानंतर पुन्हा त्याच शैलीत खेळणे थोडे अवघड होते, परंतु फखर व बाबर यांनी खणखणीत फटकेबाजी सुरू ठेवली आणि ऊछर नियमानुसार पाकिस्तानला पुढे ठेवले. २५.३ षटकांत १ बाद २०० धावांवर पुन्हा पाऊस सुरू झाला आणि पाकिस्तान २१ धावांनी पुढेच आहे. इथून पुढे सामना न झाल्यास पाकिस्तान जिंकेल, परंतु त्याने नेट रन रेटवर फार फरक पडणार नाही.
तत्पूर्वी, रचिन रवींद्र आणि केन विलियम्सन यांनी १८० धावांची विक्रमी भागीदारी करताना पाकिस्तानी गोलंदाजांना बेक्कार चोपले. न्यूझीलंडने ५० षटकांत ६ बाद ४०१ धावा केल्या. केनने ७९ चेंडूंत १० चौकार व २ षटकारांच्या मदतीने ९५ धावा केल्या. रचिनने ९४ चेंडूंत १५ चौकार व १ षटकारांच्या सहाय्याने १०८ धावा चोपल्या. डॅरील मिचेल ( २९ ) आणि मार्क चॅम्पमन ( ३९) यांनी ५१ धावांची भागीदारी केली. ग्लेन फिलिप्स व मिचेल सँटनर यांनी २६ चेंडूत ४३ धावांची भागीदारी केली. सँटनरने १७ चेंडूंत २६ धावा चोपल्या.