इस्तांबुल : इस्रायल आणि हमास युद्धाची झळ आता इतर देशांमध्ये बसू लागली आहे. तुर्कीमध्ये अमेरिकेच्या हवाई तळावर पॅलेस्टाईनने हल्ला केला आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांनी अंकारामध्ये पाऊल ठेवण्यापूर्वीच हजारो पॅलेस्टाईन समर्थकांनी हा एअरबेस ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला.
तुर्की पोलिसांनी मोर्चा सांभाळत अश्रू धुर आणि पाण्याचा मारा करत आंदोलकांना पळवून लावले. हमास-इस्रायल युद्धात जवळपास ११ हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेचा इस्रायलला पाठिंबा आहे. यामुळे तुर्कीमध्ये अमेरिकेविरोधात पॅलेस्टाईन समर्थकांनी मोर्चा उघडला होता. आयएचएच मानवतावादी रिलीफ फाउंडेशनने इस्त्रायलला अमेरिकेच्या समर्थनाचा निषेध करण्यासाठी दक्षिण तुर्कीच्या अडाना प्रांतातील इंसर्लिक एअर बेस येथे लोकाना एकत्र केले होते. इंसर्लिक एअरबेसचा वापर सीरिया आणि इराकमध्ये इस्लामिक स्टेटशी लढणा-या आंतरराष्ट्रीय युतीला पाठिंबा देण्यासाठी केला जातो. यामध्ये अमेरिकेचेही सैनिक असतात. एअरबेसबाहेर जमलेला जमाव पॅलेस्टिनी झेंडे फडकविताना आणि घोषणाबाजी करताना दिसला. एवढेच नव्हे तर पोलिसांनी लावलेले बॅरिकेड्सही आंदोलकांनी उद्ध्वस्त केले आणि त्यांच्यात हाणामारी झाली. याशिवाय आंदोलकांनी पोलिसांवर प्लास्टिकच्या खुर्च्या, दगड आणि इतर वस्तूही फेकल्या.
अश्रुधुराचा वापर
बिघडलेली परिस्थिती पाहून पोलिसांनी अश्रुधुराचा वापर करण्याचा निर्णय घेतला. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या सोडल्या आणि पाण्याच्या कॅनॉनचाही वापर केला. यानंतर जमाव संतप्त झाला आणि सुरक्षा दलांशी जोरदार चकमक झाली. पॅलेस्टाईन समर्थकांच्या निषेधाचे फोटो आणि व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.