नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या दुखापतीतून बाहेर आला आहे. २०२३ च्या विश्वचषकादरम्यान पांड्याला दुखापत झाली होती. पण आता पांड्या लवकरच मैदानात परतू शकतो. पांड्या भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात जानेवारीपासून सुरू होणा-या टी-२० मालिकेचा भाग असू शकतो. सूर्या जखमी झाल्याने पांड्याला संधी मिळू शकते.
अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-२० मालिकेत पांड्या भारतीय संघाचे नेतृत्व करू शकतो. याआधी पांड्या दुखापतीमुळे पूर्णपणे तंदुरुस्त नसल्यामुळे तो भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील मालिकेत खेळणार नसल्याच्या बातम्या आल्या होत्या. यासोबतच तो आयपीएल २०२४ मधूनही बाहेर जाऊ शकतो. पण ताज्या बातमीनुसार तो लवकरच पुनरागमन करणार आहे.
मागील दोन मालिकांत विजय मिळवून देणारा कॅप्टन सूर्यकुमार यादव दुखापतीमुळे अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेतून बाहेर पडल्याने हार्दिक पांड्या तंदुरुस्त झाल्यास त्याला कॅप्टन पदाची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे. दक्षिण आफ्रिका दौ-यात सूर्याकडे जबाबदारी होती, तर रवींद्र जडेजा उपकर्णधार होता. मात्र, अशा स्थितीत अफगाणिस्तानविरुद्ध बीसीसीआय रोहित शर्माला जबाबदारी देण्यास उत्सुक आहे. ऐनवेळी पांड्याच्या फिटनेसचा प्रश्न निर्माण झाल्यास बीसीसीआय रोहितकडे नेतृत्व देण्याच्या विचारात आहे.