17.3 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeसंपादकीयटक्का घसरला!

टक्का घसरला!

सत्ताधारी भाजपने एकीकडे ‘चार सौ पार’चा नारा देत विकसित भारतासाठी पुन्हा मोदी सरकारचे आवाहन केले आहे तर दुसरीकडे सामान्यांना ‘न्याय’ देण्यासाठी विरोधकांच्या काँग्रेसप्रणीत ‘इंडिया’ आघाडीने मतदारांना सत्तापरिवर्तनाचे आवाहन केले आहे. दोन्ही बाजूंनी प्रचाराचा जोरदार धडाकाही उडवून देण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी झालेल्या मतदानात मतदार उत्साहाने मतदानासाठी घराबाहेर पडतील अशी अपेक्षा होती. मात्र, प्रत्यक्षात मतदारांमध्ये फारसे उत्साहाचे वातावरण असल्याचे पहायला मिळाले नाहीच. त्यामुळे २०१९च्या मतदानाच्या तुलनेत यावेळी मतदानाचा टक्का घसरल्याचेच चित्र पहायला मिळाले.

हे चित्र सत्ताधा-यांसोबतच विरोधकांनाही चिंतेत टाकणारेच आहे. महाराष्ट्रात पूर्व विदर्भातील पाच मतदारसंघांसाठी शुक्रवारी मतदान झाले. रामटेक मतदारसंघासह उर्वरित चारही मतदारसंघांत मतदानाचा टक्का २०१९ च्या तुलनेत घसरल्याचेच पहायला मिळाले. नागपूर मतदारसंघात २०१९ ला ५४.७४ टक्के मतदान झाले होते. यावेळी ते ५३.९० टक्क्यांवर आले. जवळपास ४६ टक्के मतदारांनी मतदानाकडे चक्क पाठ फिरवली. चंद्रपूर मतदारसंघात २०१९ मध्ये ६४.८४ टक्के मतदान झाले होते. यावेळी ते २ टक्क्यांनी घटून ६२ टक्क्यांवर आले. गडचिरोली मतदारसंघात २०१९ मध्ये ७२ टक्के मतदान झाले होते. यावेळी ही टक्केवारी तब्बल ६ टक्क्यांनी घसरून ६६.२७ टक्क्यांवर आली. भंडारा-गोंदिया मतदारसंघात २०१९ मध्ये ६८.२७ टक्के मतदान झाले होते. यावेळी ते ६१.३७ टक्क्यांवर घसरले. रामटेक मतदारसंघातही २०१९च्या ६२.१२ टक्के मतदानाच्या तुलनेत यावेळी ५९.५८ टक्के अशी घसरण पहायला मिळाली.

२१ राज्ये व केंद्रशासित प्रदेशातील १०२ जागांसाठी देशभरात झालेल्या मतदानाची सरासरी ६०.०३ टक्के एवढी राहिली. त्रिपुरामध्ये सर्वाधिक ७९.९० टक्के तर बिहारमध्ये सर्वांत कमी ४७.४९ टक्के मतदान झाले. यंदाच्या निवडणुकीत लोकसभेच्या जागांच्या संख्येनुसार सात टप्प्यांतील हा सर्वांत मोठा टप्पा होता. ९ केंद्रीय मंत्री, दोन माजी मुख्यमंत्री आणि एका माजी राज्यपालाचे भवितव्य या टप्प्यात मतदान यंत्रात बंद झाले आहे. अंदमान-निकोबारमध्ये ५६.८७, अरुणाचल प्रदेशात ६५.४६, आसाम ७१.३८, बिहार ४७.४९, छत्तीसगड ६३.४१, जम्मू-काश्मीर ६५.०८, लक्षद्वीप ५९.०२, मध्य प्रदेश ६३.३३, महाराष्ट्र ५५.२९, मणिपूर ६८.६२, मेघालय ७०.२६, मिझोराम ५४.१८, नागालँड ५६.७७, पुद्दुचेरी ७३.२५, राजस्थान ५०.९५, सिक्कीम ६८.०६, तामिळनाडू ६३.२०, त्रिपुरा ७९.९०, उत्तर प्रदेश ५७.६१, उत्तराखंड ५३.६४, पश्चिम बंगाल ७७.५७ टक्के मतदान झाले. मतदानाची ही टक्केवारी पाहता पहिल्या टप्प्यात तरी सत्ताधारी वा विरोधकांना मतदारांमध्ये आपापल्या बाजूने लाट वा उत्साह निर्माण करण्यात अपयशच आल्याचे दिसते.

मतदारांची मतदानातील ही उदासीनता सत्ताधारी व विरोधक या दोघांचीही चिंता वाढविणारी आहे. पहिल्या टप्प्यात तरी राजकीय पक्षांना मतदारांमध्ये नेहमीचे उत्साहाचे वातावरण तयार करण्यात अपयश आले, असाच याचा अर्थ निघतो. कदाचित पहिल्या टप्प्यासाठी ज्या भागात मतदान झाले तेथील राजकीय चित्र अगोदरच ब-यापैकी स्पष्ट असल्याचाही हा परिणाम असू शकतो. या टप्प्यात तामिळनाडूत सर्वच्या सर्व ३९ जागांसाठी मतदान झाले आहे. या राज्यात इंडिया आघाडीतील द्रमुक व काँग्रेस पक्षाचे निर्विवाद वर्चस्व आहे. मात्र, भारताच्या उर्वरित भागात होणारे जागांचे नुकसान भरून काढण्याच्या दृष्टीने भाजपने या राज्यात प्रचंड जोर लावला आहे. भाजपने अण्णाद्रमुकशी असणारी आघाडी तोडून यावेळी द्रमुक व अण्णाद्रमुक या दोघांशीही हातमिळवणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यादृष्टीने भाजपने प्रदेशाध्यक्ष के. अन्नामलाई यांना ‘फ्री हँड’ दिला आहे. अन्नामलाई यांनीही दोन्ही प्रादेशिक पक्षांवर टीकेची झोड उठवत मोठी वातावरणनिर्मिती केली आहे. त्यामुळे भाजपला या निवडणुकीत आपला मतांचा टक्का वाढण्याची आशा आहे. तो वाढूही शकतो. मात्र, त्यामुळे किती जागांवर विजय मिळेल याबाबत साशंकताच आहे.

२०१९च्या निवडणुकीत भाजपने उत्तर भारतासह बहुतांश ठिकाणी आजवरची सर्वोत्तम कामगिरी नोंदविली होती. मात्र, दक्षिण भारतात भाजपला अद्यापही हात-पाय पसरता आलेले नाहीत. त्यामुळेच २०१९नंतर भाजपने तामिळनाडूवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. उत्तर भारतीय वा हिंदी भाषिक पक्ष हा शिक्का पुसून काढण्याचा भाजपचा आटोकाट प्रयत्न आहे. ‘तामिळ-काशी संगमन’ आयोजित करून उत्तर-दक्षिण सांस्कृतिक मनोमिलन घडवण्याचे प्रयत्न भाजपने केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक प्रचारसभा घेऊन तामिळनाडू अक्षरश: पिंजून काढला आहे. सनातन धर्माच्या मुद्यावरून मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन व त्यांचे पुत्र उदयनिधी यांच्यावर टीकेचा भडिमार करतानाच या मुद्यावरून काँगे्रसची कोंडी करण्याची खेळी भाजपने केली आहे. याद्वारे अण्णाद्रमुकचा हिंदू धर्माला मानणारा मतदार आपल्याकडे खेचून आपला पाया भरण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. भाजपच्या या प्रयत्नांना तामिळनाडूचे मतदार कसा प्रतिसाद देतात हे यावेळच्या निवडणुकीवरून ठरणार आहे. तामिळनाडूत यावेळी चांगली कामगिरी होण्याची भाजपला आशा आहे. तसेच प. बंगालमध्येही जागा वाढविण्याचा भाजपचा आटोकाट प्रयत्न आहे.

राजस्थानच्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील वातावरण बरेच बदलले असल्याने येथे काँग्रेस भाजपला धक्का देणारी कामगिरी करू शकतो असा अंदाज आहे. एकंदर पहिल्या टप्प्यातील १०२ जागांचे २०१९ चे बलाबल पाहता इंडिया आघाडीचे वर्चस्व स्पष्ट आहे. इंडिया आघाडीला या टप्प्यात आपली कामगिरी सुधारण्याची पूर्ण संधी आहे. त्या दृष्टीने तामिळनाडूत झालेले ६३.२० टक्के मतदान हे दोन्ही बाजूंना मतदारांमध्ये उत्साह निर्माण करण्यात आलेले अपयशच आहे, असेच म्हणावे लागेल! असो! एकंदर पहिल्या टप्प्यातील मतदानात मतदारांनी फारसा न दाखविलेला उत्साह ही सत्ताधारी व विरोधक या दोघांसाठीही चिंतेची बाब असल्याने पुढील टप्प्यांमध्ये मतदानाचा उत्साह वाढविण्यावर सर्व राजकीय पक्षांना भर द्यावा लागणार आहे, हे मात्र निश्चित!

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR