34 C
Latur
Friday, May 10, 2024
Homeसंपादकीय विशेषघसरता आलेख, कमी मतदानाने चिंता वाढवली!

घसरता आलेख, कमी मतदानाने चिंता वाढवली!

निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात २१ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील १०२ जागांसाठी शुक्रवारी मतदान झाले. यात महाराष्ट्रातले पाच मतदारसंघ होते. पूर्व विदर्भातील या पाच मतदारसंघांसाठी पहिल्या टप्प्यातील जवळपास सर्वच मतदारसंघांत २०१९ च्या तुलनेत कमी मतदान झाल्याने अनेकांची चिंता वाढली आहे. कमी मतदानाचा कोणाला फायदा होणार व कोणाला फटका बसणार याबाबत वेगवेगळे तर्क व्यक्त होत आहेत. चाळीस, बेचाळीस डिग्री तापमान व गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्राच्या राजकारणाचा जो काही चिखल झालाय ते बघून लोकांमध्ये निर्माण झालेली घृणा, यामुळे मतदानाचा टक्का घसरण्याची भीती व्यक्त केली जात होती व तसेच घडले.

भाजपाचे बलस्थान असलेल्या राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशातही मतदानाची टक्केवारी घसरल्याने सत्ताधारी पक्षातील चिंता वाढली आहे. ‘चार सौ पार’ चे बुलंद नारे दिले जात असले तरी, ‘नैय्या पार’ झाली तरी खूप आहे, अशी कुजबूज सत्ताधारी बाजूच्या लोकांमध्येच ऐकायला मिळते आहे. पहिल्या टप्प्यात पूर्व विदर्भातील पाच मतदारसंघांत मतदान झाले. महायुती व महाविकास आघाडीतील जागावाटपाच्या घोळात नेतेमंडळी अडकली असल्याने या पाच मतदारसंघांत प्रचाराची रणधुमाळी उशिरा सुरू झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्या व दुस-या टप्प्यातील मतदारसंघात अनेक सभा घेतल्या. उद्धव ठाकरे, शरद पवार, आदित्य ठाकरे, नाना पटोले यांचीही फिरती चालू आहे. त्यामुळे हळूहळू वातावरण तापायला लागले असले तरी निवडणुकीचा ज्वर मात्र कुठेच दिसत नाही. कदाचित मतदानाचा टक्का घसरायचे हे ही कारण असेल.

भाजपाच्या नेत्यांचे झंझावाती प्रचार दौरे सुरू असले तरी अजूनही त्या प्रचाराला धार आलेली दिसत नाही. २०१४ च्या निवडणुकीत ‘अच्छे दिन’चे गारूड होते. २०१९ ला बालाकोट ‘सर्जिकल स्ट्राईक’मुळे निर्माण झालेला युद्धज्वर होता. यावेळी ‘मोदीकी गॅरंटी’ हे प्रचाराचे घोषवाक्य असले तरी त्याला अपेक्षित प्रतिसाद दिसत नाही. लोकसभेच्या निवडणुकीआधी घाईघाईने राम मंदिराचे उद्घाटन करण्यात आले. परंतु तोही राष्ट्रीय मुद्दा होताना दिसत नाही. त्यातच महाराष्ट्राच्या बदललेल्या राजकारणाने त्यांची चिंता वाढवली आहे. पहिल्या टप्प्याच्या मतदानापूर्वी या निवडणुकीचे शेवटचे ओपिनियन पोल आले. जवळपास सर्वच वाहिन्यांच्या सर्वेक्षणात महाराष्ट्रात युतीच्या जागा कमी होतील असे अंदाज वर्तवण्यात आले आहेत. २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा युतीला महाराष्ट्रात ४८ पैकी ४१ जागांवर यश मिळाले होते. हे संख्याबळ २६ ते ३० च्या दरम्यान येऊ शकते असे अंदाज व्यक्त करण्यात आले आहेत.

भाई चक्रव्यूहात, तर दादा बारामतीच्या भोव-यात अडकले !
दोन पक्ष फोडून सत्ता मिळवली असली तरी लोकसभेच्या जागांमध्ये मोठी घट होत असल्याचे दिसत असल्याने भाजपात अस्वस्थता आहे. तर लोकसभेच्या जागा सोडताना, उमेदवार ठरवताना भाजपाने वापरलेल्या दबावतंत्रामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत व अजित पवारांच्या राष्ट्रवादीत चुळबुळ वाढली आहे. विद्यमान खासदार सोबत असतानाही नाशिकसाठी मुख्यमंत्र्यांना अडून बसावे लागले. त्यांच्या स्वत:च्या ठाणे शहरावर हक्क सांगून भाजपाने ही जागा अडकवून ठेवली आहे. निकराची लढाई करून छ. संभाजीनगरची जागा मिळवली, पण रत्नागिरी- सिंधुदुर्ग सोडावे लागले. भाजपाच्या दबावामुळे हिंगोली, वाशिमचे उमेदवार बदलावे लागले.

आपल्यापेक्षा निम्मे आमदार असतानाही भाजपाने शिंदेंना मुख्यमंत्री केले. पण त्यांनी आपण देऊ तेवढ्याच जागा लढवाव्यात अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे शिंदे समर्थक आमदार अस्वस्थ झाले आहेत. आत्ताच असे असेल तर विधानसभेला कसे असेल ? असा प्रश्न विचारतात. माजी मंत्री सुरेश नवले यांनी परवा या अस्वस्थतेला वाचा फोडली. भाजपाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चक्रव्यूहात अडकवले आहे. त्यांचा अभिमन्यू झाला असून, भाजपच्या भट्टीत शिवसैनिकांचे बळी जात आहेत, अशी जळजळीत टीका सुरेश नवले यांनी केली. ज्याप्रमाणे शिंदेंच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आलेल्या खासदारांचे पत्ते कापले गेले, त्याचप्रमाणे विधानसभेच्यावेळी कुठल्यातरी अहवालाचे दाखले देऊन शिवसेनेच्या आमदारांना उमेदवारी नाकारली जाईल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.

अजित पवार यांची स्थिती यापेक्षाही वाईट आहे. त्यांना मुळातच पाच जागा देण्यात आल्या आहेत. त्यातील परभणीची जागा रासपच्या महादेव जानकर यांना द्यावी लागली. धाराशिवमध्ये भाजपाचे आमदार असलेल्या राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांना पक्षात घेऊन उमेदवारी द्यावी लागली. शिरूरमध्येही जागा घेताना शिंदेंच्या शिवसेनेत असलेल्या शिवाजीराव आढळरावांना पक्षात घेऊन उमेदवारी द्यावी लागली. त्यामुळे प्रत्यक्षात त्यांच्या म्हणता येतील अशा दोनच जागा आहेत त्या म्हणजे सुनील तटकरे यांची रायगड व सुनेत्रा पवार निवडणूक लढवत असलेली बारामती. बारामतीची जागा आता त्यांच्या प्रतिष्ठेची झाली आहे. ते याच मतदारसंघात अडकून पडले आहेत. पवार कुटुंबातील कलह विकोपाला गेला असून, त्याला आता ओंगळवाणे स्वरूप आले आहे. निवडणुकीचा निकाल काय लागायचा तो लागेल, पण अजित पवार यांच्या दीर्घकालीन राजकारणाला मात्र यामुळे मर्यादा पडणार आहेत. बारामतीला कुटुंबातील व्यक्तीला निवडणुकीत उतरण्याचा त्यांचा निर्णय चुकीचा ठरला, असे त्यांच्याच पक्षातले लोक खासगीत सांगतात.

फडणवीस, उद्धव ठाकरेंचा कलगीतुरा !
उद्धव ठाकरे व देवेंद्र फडणवीस यांच्यातील संघर्ष नवा नाही. गेली पाच वर्षे महाराष्ट्राचे राजकारण याच्याच भोवती फिरतेय. पण निवडणुकीच्या निमित्ताने या संघर्षाने एक नवीन पातळी गाठली असून, रोज नवनवीन गोष्टी बाहेर येत आहेत. २०१९ च्या निवडणुकीनंतर फडणवीस यांनी आदित्यला मंत्री करून चांगला तयार करतो व अडीच वर्षांनी त्याला मुख्यमंत्री करून मी दिल्लीला जातो, अशी ऑफर दिली होती असा गौप्यस्फोट उद्धव ठाकरे यांनी एका मुलाखतीत केला. यावर उत्तर देताना फडणवीस यांनी, उद्धव ठाकरे भ्रमिष्ट झाले आहेत, त्यांच्या डोक्यावर परिणाम झालाय, असे सुनावले. त्यावर बाळासाहेबांच्या खोलीत अमित शहा व माझी काय चर्चा झाली होती हे फडणवीस यांना माहीत नाही, कारण अमित शहांनी त्यांना, ‘तू बाहेर बस, आम्हाला बोलायचंय’ असे सांगून बाहेर काढले होते, असा दुसरा बॉम्ब उद्धव ठाकरेंनी टाकला. यामुळे फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात चांगलीच जुंपली असून, पुढील काही दिवस ही आतषबाजी रंगणार अशी चिन्हं आहेत.

आयोगाची नोटीस, उद्धव ठाकरेंना फुलटॉस!
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाऊन बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली, हिंदुत्व सोडले, असा आरोप भाजप व शिंदेंच्या शिवसेनेचे नेते त्यांच्यावर सातत्याने करत असतात. तर भाजपाला सोडणे म्हणजे हिंदुत्व सोडणे नव्हे, असे उद्धव ठाकरे यावर स्पष्टिकरण देतात. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने मागच्या आठवड्यात उद्धव ठाकरे यांना प्रचार गीतातील ‘हिंदू धर्म’ व ‘जय भवानी’ हे दोन शब्द वगळण्यासाठी नोटीस दिली. ही नोटीस धुडकावून लावत आपण हिंदुत्व सोडलेले नाही हे सांगण्याची संधी उद्धव ठाकरेंना आपोआपच मिळाली. त्याचं झालं असं, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मशाल हे चिन्ह मिळाले आहे. हे चिन्ह लोकांपर्यंत पोचवण्यासाठी, लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी मशाल गीत प्रसिद्ध करण्यात आले. परंतु, या प्रचार गीतामधील दोन शब्दांवर आक्षेप घेत ते शब्द काढून टाकण्यासाठी निवडणूक आयोगाने नोटीस दिली आहे. मध्य प्रदेश, कर्नाटकच्या विधानसभा निवडणुका सुरू असताना त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी धर्माच्या नावावर मते मागितली होती. ज्याबाबतची तक्रार उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाकडे केली होती. ज्याचे कोणतेही उत्तर देण्यात आलेले नाही. परंतु, आता आम्ही जे प्रचारासाठी गीत दिले होते, त्यातील दोन शब्द काढून टाकण्याची नोटीस निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे. मात्र आम्ही जय भवानी, जय शिवाजी म्हणतच राहणार, काय कारवाई करायची ती करा, असे सुनावत उद्धव ठाकरे यांनी आयोगाचा चेंडू स्टेडियमबाहेर भिरकावला आहे.

-अभय देशपांडे

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR