लातूर: प्रतिनिधी
लातुरातील खंडापूर शिवारात झालेल्या अखंड हरीनाम सप्ताह आणि संत पादुका दर्शन सोहळ्यात भक्तांनी दिलेल्या कोट्यावधी रुपयांच्या दानावर डल्ला मारून फरार झालेल्या आणि लोकांना पिस्तूल दाखवून धमकावणा-या किशोर शिवणीकर जाधव उर्फ पिस्तुल्या महाराजाचा पोलिस कोठडीत मुक्काम वाढला आहे.
न्यायालयाने पुन्हा एकदा किशोर जाधव शिवणीकरला ३ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. या आधी स्थानिक गुन्हे शाखेने किशोर शिवणीकरला त्याच्या दीड कोटींच्या वादग्रस्त बंगल्यातल्या तिस-या मजल्यावरून अटक केल्यानंतर एमआयडीसी पोलिस ठाण्यात हजर केले होते. त्यानंतर न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती, तर आता पुन्हा एकदा न्यायालयाने तीन दिवसांची वाढीव पोलीस कोठडी सुनावली आहे.
अनेक महिने फरार असलेल्या पिस्तुल्या महाराजाला लातूरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक करून न्यायालयासमोर हजर केले होते. त्यानंतर न्यायालयाने त्यांच्या कोठडीत ४ दिवसांची वाढ केली होती. पोलिस या प्रकरणातील आर्थिक व्यवहार, जमवलेला निधी आणि त्यातील गैरव्यवहाराचा सखोल तपास करत असून आज १६ जुलै रोजी पुन्हा एकदा न्यायालयाने किशोर जाधव शिवणीकरला ३ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
















