छत्रपती संभाजीनगर : प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यामध्ये महाविकास आघाडीने गेट वे ऑफ इंडियाच्या दिशेने प्रस्थान केले आहे. प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारत घटनेचा निषेध करण्यात येत आहे. दरम्यान, छत्रपती संभाजीनगरमध्ये मविआच्या ‘जोडे मारो’ आंदोलनात पोलिसांची धरपकड झाली. जोडे मारण्यासाठी प्रतिकात्मक पुतळा घेऊन येणा-या आंदोलकाला पकडण्यासाठी पोलिस धावले. यावेळी पोलिसांपासून वाचण्यासाठी आंदोलकाला पुतळा छातीशी कवटाळत पळावे लागल्याचे दिसून आले.
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यात संतापाची लाट उसळली आहे. मुंबईत मविआने एल्गार पुकारला आहे. अनेक दिग्गज नेत्यांसह कार्यकर्ते, आंदोलक मोर्चा काढत असून राज्यातील विविध जिल्ह्यांमध्येही मविआची आंदोलने सुरू आहेत.
छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौक परिसरात मविआचे कार्यकर्ते, आंदोलक जमले होते. यावेळी पोलिसांचा कडक बंदोबस्त करण्यात आला होता. दरम्यान, बाहेरच्या बाजूने एक कार थांबली. त्यातून एक आंदोलक जोडे मारण्यासाठी पांढ-या कापडात गुंडाळलेला प्रतिकात्मक पुतळा घेऊन क्रांती चौकाच्या दिशेने चालू लागला. यावेळी चार-पाच पोलिसांनी पुतळा काढून घेण्यासाठी आंदोलकाला पकडण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांपासून वाचण्यासाठी आंदोलकाला पुतळा धरत पळावे लागले. यावेळी क्रांती चौकात मोठ्या प्रमाणात मविआचे कार्यकर्ते, आंदोलक जमले होते.