सोलापूर : बदलापूर येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर सोलापूर जिल्हा माध्यमिक व प्राथमिक शिक्षण विभागाने सावध भूमिका घेतली आहे. या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर शाळांत नेमलेले बसचालक, काळजीवाहक, सफाई कर्मचारी व सुरक्षारक्षक यांचे पोलीस व्हेरिफिकेशन करण्यात येणार असल्याची माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी दिली.
मुलींच्या सुरक्षेच्यापार्श्वभूमीवर सखी सावित्री समिती बहुतांश शाळेत नेमण्यात आली आहे. शाळेत तक्रार पेटी, सीसीटीव्ही बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे. याची अंमलबजावणी ज्या शाळांनी केली नाही, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचेही शिक्षणाधिकारी जगताप यांनी सांगितले.
सोलापूर शहर – जिल्ह्यात ४ हजार ८८६ प्राथमिक व माध्यमिक शाळा आहेत. २ हजार ७९६ प्राथमिक व १ हजार ७५ अनुदानित, १ हजार १५ खासगी अशा २ हजार ९० माध्यमिक शाळा आहेत. जिल्हा परिषद शाळांचा अपवाद सोडून बहुतांश खासगी व स्वयंअर्थसहाय्यित शाळांत विद्यार्थ्यांच्या ने आणसाठी बसचालक, काळजीवाहक, सफाई कर्मचारी व सुरक्षा रक्षकांची नेमणूक केली आहे. मात्र, त्या कर्मचाऱ्यांचे पोलीस व्हेरिफिकेशन झाले नाही. त्यामुळे मुलींची सुरक्षा वाऱ्यावर असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. मात्र, वेळोवेळच्या बैठकांत मुलींच्या सुरक्षेबाबत केंद्रप्रमुख व मुख्याध्यापकांना सूचना देण्यात आल्याचे स्पष्टीकरण शिक्षण विभागाकडून देण्यात आले.
शहरातील प्राथमिकच्या ४० तर जिल्ह्यात माध्यमिकच्या १५ टक्के शाळांत सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. सर्वच शाळांना सीसीटीव्ही बसविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गुणवत्ता विकास कार्यक्रमांतर्गत ३१ ऑगस्टपर्यंत शाळा तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. ही मोहीम राबवित असताना ज्या त्रुटी आढळतील त्याची पूर्तता संबंधित शाळेकडून तात्काळ करून घेण्यात येणार असल्याचे शिक्षणाधिकारी जगताप यांनी सांगितले.