19.4 C
Latur
Monday, October 13, 2025
Homeमहाराष्ट्रबदली रद्द करण्यासाठी पोलिसाचा ‘जुगाड’

बदली रद्द करण्यासाठी पोलिसाचा ‘जुगाड’

बनावट कागदपत्रे जोडल्याप्रकरणी गुन्हा दाखल

ठाणे : महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधीकरणामध्ये (मॅट) आपल्या मुदतपूर्व बदलीला आव्हान देण्यासाठी बनावट कागदपत्रे जोडणा-या पोलिस अमलदार विवेक जाधव यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती नौपाडा पोलिसांनी रविवारी दिली. कर्तव्यात कसुरी केल्याने जाधव यांची नौपाडा पोलिस ठाणे ते मुख्यालय अशी मुदतपूर्व बदली झाली. याच बदलीला आव्हान देण्यासाठी त्यांनी मॅटमध्ये दावा दाखल केला. याच दाव्यासाठी त्यांनी बनावट कागदपत्रे जोडल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या पडताळणीमध्ये आढळले.

जाधव यांची नौपाडा पोलिस ठाण्यातून ठाणे शहर पोलिस मुख्यालयात १८ सप्टेंबर रोजी बदली झाली होती. त्यानुसार त्यांना पोलिस ठाण्यातून कार्यमुक्त केले होते. या बदलीविरोधात त्यांनी मॅटमध्ये धाव घेतली होती. त्याबाबतचे पत्र वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना ४ ऑक्टोबर रोजी कुरिअरद्वारे प्राप्त झाले. जाधव यांनी मॅटमध्ये दावा केलेल्या कागदपत्रांची वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय महाजन यांनी पडताळणी केली. त्यात जाधव ६ ऑगस्ट रोजी त्यांच्या आजाराबाबत व त्यांच्यावर चालू असलेल्या औषधोपचाराबाबतची वैद्यकीय कागदपत्र पोलिस ठाण्यातील कर्तव्यावरील अधिकारी, तसेच अंमलदारांकडे दिल्याबाबत सही व शिक्का असलेले पत्रही सादर केल्याचे आढळले.

५ ऑक्टोबर रोजी ठाणे अंमलदार म्हणून कर्तव्यावरील इतर अधिकारी, तसेच अंमलदार यांना जाधव यांनी त्यांच्या औषधोपचाराचे कागदपत्र दिले होते का? दिले असतील तर त्याची माहिती आपल्याला का दिली नाही, अशी विचारणा महाजन यांनी केली. त्याचवेळी जाधव यांनी मॅट न्यायालयात सादर केलेल्या पत्रावर आपल्यापैकी कोणी सही व शिक्का दिला याचीही पडताळणी केली. यात अंमलदार यांच्या नावाचा शिक्का मारून त्यावर ६ ऑगस्ट रोजी कागदपत्र प्राप्त झाल्याची नौपाडा पोलीस ठाणे अंमलदारांची बनावट सही त्यांनीच केल्याचेही आढळले. न्यायाधिकरणाची त्यांनी दिशाभूल केल्याचे आढळल्याने त्यांच्याविरुद्ध १० ऑक्टोबर रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR