मुंबई : राज्यातील महानगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पुढे ढकलण्याच्या मूडमध्ये नाही. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात प्रभाग रचना पूर्ण होईल, मग रिझर्व्हेशन पडतील, मग नोटिफिकेशन निघेल. त्यामुळे साधारण ऑक्टोबर महिन्यात एक ग्रुप जिल्हा परिषदा किंवा नगरपालिका, नोव्हेंबर महिन्यात एक ग्रुप जिल्हा परिषदा, एकावेळेस निवडणुका घेता येणार नाहीत. असे करता करता महानगरपालिकेच्या निवडणुका शेवटी डिसेंबर महिन्यात होतील, असे सूतोवाच भाजपा नेते आणि राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.
पत्रकारांशी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, लोकशाहीत कोणी कोणावर बोलू शकते. उद्धव ठाकरे २०१९ ला मुख्यमंत्री झाल्यापासून अशा प्रकारची विधाने करत आहेत, जी सामान्य माणसाला आवडत नाहीत. पण उद्धव ठाकरेंना कोण आवरणार? त्याने काही फरक पडत नाही. दोन ठाकरे एकत्र आल्याचा हिंदू माणसाला आनंदच झालेला आहे. परंतु, ठाकरे बंधू किती दिवस एकत्र राहतात. निवडणुकांपर्यंत तरी एकत्र राहतात की त्या आधीच वेगळे होतात, हे काळच ठरवेल, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होतेच की, आता उद्धव ठाकरे हे पुढचा मुद्दा मुंबई तोडणार असल्याचाच मांडणार. कसली मुंबई तोडणार? कुणाची हिंमत आहे मुंबई तोडण्याची? आम्ही मेलोत का? मुंबई काही कुणी तोडत नाही. पण, दरवेळेस मराठी माणसांच्या भावनांशी खेळायचे, हिंदी-मराठी विषय असाच केला आहे. मराठी माणूस हुशार झालेला आहे. आतापर्यंत हे दोन्ही भाऊ एकत्र का आले नाहीत, मुंबई महानगरपालिका जाणार असे आता त्यांना दिसूू लागले आहे. गेल्या २० वर्षांत कधी राज ठाकरेंना विचारले नाही. आम्हाला कुणीही नको, अशाच मानसिकतेत तुम्ही होतात. दिल्ली गेले, राज्य गेले आणि आता महापालिकाही गेली, तर ठाकरे सगळेच गमावून बसतील, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली.