मुंबई/धाराशिव: राजकीय वर्तुळातून एक अतिशय मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे. शिवसेना ठाकरे गटात पुन्हा एकदा मोठी फूट पडली असून, पक्षाच्या नऊ पैकी सहा खासदारांनी बंडखोरीचा झेंडा फडकवला आहे. हा शिवसेना ठाकरे गटासाठी अत्यंत मोठा आणि धक्कादायक निर्णय मानला जात आहे. या बंडखोर खासदारांमध्ये धाराशिवचे लोकप्रिय खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या नावाचाही समावेश होता. मात्र, शनिवारी त्यांनी “मी अजून पक्षप्रवेशाबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही, मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच पुढचे पाऊल टाकेन,” असे विधान केल्यामुळे शिवसेना शिंदे गटाचे टेन्शन वाढले होते. पण आता अखेर ओमराजे निंबाळकर यांनी आपली अधिकृत भूमिका जाहीर केली असून ठाकरे गटाला जय महाराष्ट्र केला आहे.
कार्यकर्त्यांच्या दरबारात झाला मोठा निर्णय
ओमराजे निंबाळकर यांनी आज धाराशिव लोकसभा मतदारसंघातील आपल्या जीवाभावाच्या कार्यकर्त्यांची आणि मतदारांची एक महत्त्वपूर्ण बैठक बोलावली होती. या बैठकीला दुपारी सव्वाचार वाजेपासून हजारो कार्यकर्त्यांनी हजेरी लावली होती. रात्री ८ वाजेपर्यंत सलग ४ तास ओमराजे यांनी प्रत्येक कार्यकर्त्याचे मत आणि सूचना जाणून घेतल्या. या प्रदीर्घ चर्चेनंतर त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करण्याचा अंतिम निर्णय जाहीर केला.
…म्हणून घेतला ठाकरे गट सोडण्याचा निर्णय!
आपली भूमिका स्पष्ट करताना ओमराजे निंबाळकर भावूक झाले होते. त्यांनी गेल्या काही वर्षांतील स्थानिक राजकारणाची पार्श्वभूमी मांडताना सांगितले की, “स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये आपले कार्यकर्ते जीवाचे रान करून लढले. मात्र, धाराशिवमधील एकाही पंचायत समितीत किंवा नगरपालिकेत आपल्याला यश मिळाले नाही. मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी २४ तास सामान्य लोकांसाठी दिले, प्रामाणिकपणे काम केले. आमचा कार्यकर्ता कधीही कामात किंवा लोकांच्या समस्या सोडवण्यात कमी पडला नाही. पण, सत्ता नसल्यामुळे आपल्याला पराभवाला सामोरे जावे लागले.”
ते पुढे म्हणाले की, सत्तेत नसल्यामुळे सामान्य माणसाची साधी कामे करणे, अगदी ट्रान्सफॉर्मरच्या अडचणी सोडवणेही कठीण झाले होते. आम्ही सामान्य माणसाच्या कामासाठी राजकारणात आहोत. त्यामुळेच कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव आणि संमतीने आम्ही आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात काम करण्याचा निर्णय घेतला आहे.
ठाकरे गटाला मोठा हादरा, शिंदे गट बळकट
ओमराजे निंबाळकर यांच्या या अधिकृत घोषणेमुळे शिवसेना ठाकरे गटाला मराठवाड्यात खूप मोठा फटका बसला आहे. तर दुसरीकडे, ओमराजेंच्या संभ्रमावस्थेमुळे चिंतेत असलेल्या शिंदे गटाला आता मोठा दिलासा मिळाला असून धाराशिवमध्ये त्यांची ताकद कमालीची वाढली आहे. ठाकरे गटाच्या एकूण ९ खासदारांपैकी ६ जण फुटल्यामुळे आता संसदेतही ठाकरे गटाचे स्थान अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
















