नवी दिल्ली : भारताने मंगळवारी ओडिशाच्या किनारपट्टीवरील अब्दुल कलाम बेटावरून पृष्ठभागावरून जमिनीवर मारा करणाऱ्या शॉर्ट-रेंज बॅलिस्टिक क्षेपणास्त्र (एसआरबीएम) ‘प्रलय’ची यशस्वी चाचणी केली. एका संरक्षण अधिकाऱ्याने ही माहिती दिली. हे क्षेपणास्त्र संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ ) विकसित केले आहे. अधिका-याने सांगितले की, क्षेपणास्त्र सकाळी ९.५० च्या सुमारास प्रक्षेपित केले गेले आणि त्याने आपली सर्व उद्दिष्टे पूर्ण केली.
लडाखमध्ये चिनी आणि भारतीय सैन्यात झालेल्या संघर्षानंतर भारतीय संरक्षण दलाने या क्षेपणास्त्राचा प्रस्ताव दिला होता. यापूर्वी, २०२१ मध्ये सलग दोन दिवस या क्षेपणास्त्राची दोनदा यशस्वी चाचणी घेण्यात आली होती आणि तेव्हापासून सैन्य त्याच्या संपादन आणि इंडक्शनच्या दिशेने काम करत होते. ते म्हणाले की, ‘प्रलय’ क्षेपणास्त्राची तुलना चीनच्या ‘डोंग फेंग १२’ आणि रशियाच्या ‘इस्कंदर’शी करण्यात आली आहे. युक्रेनसोबत सुरू असलेल्या युद्धात रशियाने इस्कंदरचा वापर केला होता हे विशेष. याशिवाय ते पाकिस्तानच्या संरक्षण प्रणालीमध्ये असलेल्या सामरिक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचाही मुकाबला करू शकते.
विशेष म्हणजे, एक महिन्यापूर्वीच भारतीय हवाई दलाने लांब पल्ल्याच्या हवेतून मारा करणाऱ्या ब्रह्मोस क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली होती. बंगालच्या उपसागरात हवाई दलाने ही चाचणी घेतली, ज्यामध्ये सुखोई-३० एमकेआय या लढाऊ विमानातून ब्रह्मोस क्रूझ क्षेपणास्त्र सोडण्यात आले. हे क्षेपणास्त्र १५०० किलोमीटर अंतरापर्यंत आपल्या लक्ष्यावर मारा करण्यास सक्षम आहे. ब्रह्मोस क्षेपणास्त्र हे भारतातील सर्वात घातक शस्त्रांपैकी एक आहे.
एलएसी आणि एलओसीवर तैनात
शेजारी देश चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवर देशाच्या संरक्षण गरजा लक्षात घेऊन डीआरडीओने हे क्षेपणास्त्र विकसित केले आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषा आणि नियंत्रण रेषेवर प्रलय तैनात केले जाईल, असे अधिकाऱ्याने माध्यमांना सांगितले.
३५० ते ५०० किमी पल्ल्याचे क्षेपणास्त्र
अधिकाऱ्याने सांगितले की, समुद्रकिनाऱ्याजवळील अनेक उपकरणांद्वारे त्याच्या लॉन्चिंगचे निरीक्षण केले गेले. “प्रलय हे ३५० ते ५०० किलोमीटरच्या पल्ल्याचे क्षेपणास्त्र आहे. ते ५०० ते १,००० किलो वजनाचे पेलोड वाहून नेण्यास सक्षम आहे.