24.8 C
Latur
Monday, September 30, 2024
Homeसोलापूर'चंपा' शब्दाच्या हावभावप्रकरणी प्रणिती शिंदेंवर सोशल मीडियातून टीकेची झोड

‘चंपा’ शब्दाच्या हावभावप्रकरणी प्रणिती शिंदेंवर सोशल मीडियातून टीकेची झोड

सोलापूर —काँग्रेसच्या नूतन खासदार प्रणिती शिंदे यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याबाबत ‘चंपा’ असा हावभाव केला. त्यावरून सोशल मीडियावर नूतन खासदारावर टीका होत आहे. या प्रकरणात ‘ताई तुमचं चुकलंच’, अशी प्रतिक्रिया सर्वसामान्यांतून उमटत आहे. त्यामुळे सध्यातरी सोशल मीडियावर खा. शिंदे या टीकेच्या धनी ठरत आहेत, तर ताईंना ट्रोल केलेल्यांना काँग्रेस कार्यकर्त्यांकडून प्रत्युत्तर देण्यात येत आहे. त्यामुळे सोशल मीडियावर भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमने सामने आल्याचे चित्र सध्या दिसत आहे.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे दोन दिवसांपूर्वी सोलापूर दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी खासदार, आमदारांची बैठक बोलावली होती. त्यामुळे खा. शिंदे यांना दक्षिण सोलापूर तालुक्यातील कंदलगाव येथील कार्यक्रमास जाण्यास उशीर झाला. त्यावेळी त्यांनी कार्यक्रमासाठी वाट पाहणाऱ्या नागरिकांची माफी मागितली. तसेच त्या म्हणाल्या, मी कार्यक्रमास सकाळीच येत होते; मात्र ‘चंपा’चा हवाभाव करत या कारणांमुळे येण्यास उशीर झाल्याचे सांगितले. त्यावेळी तेथील नागरिकांना हसू आवरले नाही; मात्र जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांबद्दल असे हावभाव करणे योग्य नसल्याच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर येत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून इतर भाजपच्या मोठ्या नेत्यांना त्या टार्गेट करत आहेत. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांकडून त्यांना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात येत आहे. त्यातच त्यांनी ‘चंपा’चा हावभाव केल्यामुळे त्या टीकेच्या धनी होत आहेत. त्यांनी योग्य वेळीच सावध होण्याची गरज आहे; अन्यथा याचा फटका विधानसभेत बसेल.

खा. शिंदे यांनी पालकमंत्र्यांबाबत ‘चंपा’ असा हावभाव केल्यामुळे त्या सोशल मीडियावर चांगल्याच ट्रोल झाल्या आहेत. त्यांच्यावर सोशल मीडियातून टीका होत असताना काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर देत ताईंना पाठिंबा दिला आहे. अंधभक्तांना ताईंना बोलण्याचा अधिकार नाही. गांजाची झाडे तुळशीला पावित्र्य शिकवत होते म्हणे, तसे अंधभक्तांचे सुरू आहे, असा टोला भाजप कार्यकर्त्यांना मारला आहे. या प्रकरणामुळे सोशल मीडियावर वॉर सुरू झाले आहे.

‘वारंवार तथ्यहीन वक्तव्य करून पप्पाची परी ही बौद्धिक अपरिपक्व आहे, हे दिसून येत आहे’, ‘सुसंस्कृत कुटुंबाची असंस्कृत कन्या’, ‘कुणाची पोरगी हाय रं’, ‘पापा की परी, राहा घरी’ अशा विविध प्रकारे भाजप कार्यकर्त्यांसह तरुणांकडून ट्रोल करण्यात येत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR