परभणी : येथील श्री शिवाजी महाविद्यालयाचा विद्यार्थी प्रथमेश प्रफुल्ल शहाणे याने हार्मोनियम सोलो (सुरवाद्य) या कला प्रकारात देशात दुसरा क्रमांक पटकावला आहे. नवी दिल्ली येथील राष्ट्रीय बालभवनात १३ जानेवारी रोजी एनसीईआरटीच्या वतीने राष्ट्रीय कला उत्सव घेण्यात आला. या उत्सवात प्रथमेशने हार्मोनियम (सुरवाद्य) वादनात देशात दुसरा येण्याचा बहुमान मिळवत परभणीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
सदरील स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात केंद्रीय शिक्षा राज्यमंत्री सुभाष सरकार, राज्य परराष्ट्रमंत्री राजकुमार रंजन सिंह, खा. गौतम गंभीर यांच्या हस्ते प्रथमेशचा सन्मान करण्यात आला. यापूर्वी त्याने जिल्हा, विभाग आणि महाराष्ट्रात प्रथम येण्याचा मान मिळवला होता. प्रथमेश यास प्रफुल्ल शहाणे, अरविंद शहाणे तसेच प्रा.अंकुश खटिंग यांचे मार्गदर्शन लाभले. प्रथमेशच्या यशाबद्दल महाविद्यालय विकास समितीचे प्रमुख सदस्य हेमंतराव जामकर, प्राचार्य डॉ.बाळासाहेब जाधव, उपप्राचार्य डॉ.श्रीनिवास केशट्टी, उपप्राचार्य डॉ.रोहिदास नितोंडे, उपप्राचार्य प्रा.आप्पाराव डहाळे, प्रा.सतीश जाधव, पर्यवेक्षक प्रा.नारायण राऊत आदींनी अभिनंदन केले.