लातूर : प्रतिनिधी
जिल्ह्यात ऐन दिवाळ सणासुदीच्या दिवसात जीवनावश्यक वस्तूंच्या दर वधारल्याने सर्वसामान्यांच्या खिशाचे अर्थिक दिवाळे निघत आहे. जिवनावश्यक वस्तू असलेल्या तेल,डाळी, दूध, भाज्यांचे दर सतत वाढत आहेत. वाढत्या महागाईने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. त्यामुळे दिवाळसण साजरा करावा तरी कसा असा प्रश्न आहे. लातूर जिल्ह्याचे शेती हेच प्रमुख आर्थिक साधन आहे. लोकांचे अर्थकारण शेतीवर अवलंबून आहे. त्यामुळे शेतातून चांगले उत्पन्न हाती आले, तरच सणवार चांगल्या पद्धतीने साजरे केले जातात. मात्र यंदा खरीप हंगामावर निसर्गाची अवकृपा झाली आहे. अत्यल्प पाऊस रोगराईने खरीप हंगाम हातचा वाया गेला. त्यात रब्बी हंगामाही येण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे शेतक-यांसमोर वर्षभराच्या अर्थकारणाची चिंता आहे.
दिवाळसण काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. हा सण साजरा करण्याची च्ािंता शेतक-यांना सतावत असताना जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढत आहेत. डाळीचे भाव सतत वाढत आहेत. दुसरीकडे सणासुदीला महत्वाचे असलेले रवा, मैदा, डालडा, साखर, तुपाचे दर वाढले आहेत. चहापत्ती,खोबरे,शेंगदाणे, मसाला दरातही वाढ झाली आहे. त्यामुळे आता सणासुदीच्या दिवसात महागाईने गोडवा कमी केला आहे. दररोजच्या आहारात उपयोगी डाळीचे दर मागील काही दिवसापासून वधारले असून बाजारपेठेत पुढील काळात आणखीन डाळीचे दर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मागील काही दिवसापासून तूर डाळ भाव खात आहे १७० रुपये किलो असा डाळीचा दर आहे. मूग व उडदाची आवक नसल्याने दोन्ही डाळीचे दर वाढले आहेत. मसूरडाळ ही १०० पार केली आहे. हरभरा दाळ शतक गाठण्याच्या तयारीत आहे. साखर प्रतिकिलो ४२ पर्यंत गेली असून गुळाचे ही भाव वधारत असल्यानेसर्वसामान्यांचा दिवाळीचा गोडवा दुरावत चालला आहे.