28.5 C
Latur
Tuesday, May 28, 2024
Homeराष्ट्रीयकोरोना लसीच्या सर्टिफिकेटवरून पंतप्रधान मोदींचा फोटो काढला!

कोरोना लसीच्या सर्टिफिकेटवरून पंतप्रधान मोदींचा फोटो काढला!

नवी दिल्ली – कोरोना विषाणू प्रतिबंधक लस कोविशिल्डचे काही दुष्परिणाम असल्याचे समोर आले आहे. यामुळे मोठा वाद देखील निर्माण झाला आहे. त्यातच भारत सरकारच्या केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. कोविड-१९ लसीच्या सर्टिफिकेटवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो काढण्यात आला आहे.

देशात मोठ्या प्रमाणात लोकांचे लसीकरण झाले आहे. या सगळ्याचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले जाते. भाजप नेत्यांनी याचा जोरदार प्रचार केला होता. मात्र, कोविशिल्ड लस बनवणारी कंपनी एस्ट्राजेनेकाने यूकेच्या कोर्टामध्ये दुष्परिणामांबाबत कबुली दिली आहे. त्यानंतर आरोग्य मंत्रालयाने हे मोठे पाऊल उचलल्याची चर्चा सुरू आहे.

कोविशिल्ड लस घेतल्याने थ्रोम्बोसिससोबत थ्रोम्बोसाइटोपेनिया सिंड्रोम (टीटीएस) होतो असे कंपनीने कबूल केले आहे. अनेक भारतीय लोकांनी आपले कोरोना सर्टिफिकेट तपासले असता त्यांना पंतप्रधान मोदी यांचा फोटा दिसला नाही. याठिकाणी क्यूआर कोड दिसत आहे. त्यामुळे आरोग्य मंत्रालयाने हा फोटो हटवला असल्याचे स्पष्ट आहे. ‘द हिंदू’ने यासंदर्भातील बातमी दिली आहे.

आरोग्य मंत्रालयाने काय सांगितले?
पंतप्रधान मोदी यांचा फोटो हटवण्यात आल्याने सोशल मीडियावर विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. मात्र, आरोग्य मंत्रालयाकडून यासंदर्भात स्पष्टीकरण देण्यात आले आहे. मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे की, सध्या लोकसभा निवडणुका सुरू असल्याने आचारसंहिता सुरू आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो सर्टिफिकेटवरून हटवण्यात आला आहे.

याआधीही हटवण्यात आलाय फोटो!
पंतप्रधान मोदी यांचा फोटो सर्टिफिकेटवरून हटवण्यात आल्याची ही पहिली वेळ नाही. २०२२ मध्ये उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, मणिपूर आणि गोवा येथे निवडणुकीच्या दरम्यान मोदींचा फोटो सर्टिफिकेटवरून काढण्यात आला होता. निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर हा निर्णय घेण्यात आला होता. पण, सध्याच्या या घटनेला एस्ट्राजेनेका कंपनीने दिलेल्या कबुलीसोबत जोडून पाहिले जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR