34.2 C
Latur
Tuesday, May 21, 2024
Homeसोलापूरखोटी शपथ घेणा-यांना आता शिक्षा करण्याची वेळ आलीय

खोटी शपथ घेणा-यांना आता शिक्षा करण्याची वेळ आलीय

तालुका प्रतिनिधी : अकलूज
१५ वर्षांपूर्वी एक मात्तबर नेता दुष्काळी भागाला पाणी देतो, म्हणून येथे निवडणूक लढविण्यासाठी आला होता. त्यावेळी मावळत्या सूर्याला साक्षी ठेवून त्यांनी शपथही घेतली होती. पण त्यांनी हे आश्वासन पूर्ण केले नाही. मग अशा लोकांना तुम्ही शिक्षा देणार नाही का, त्यांना शिक्षा देण्याची वेळ आली आहे, असे वक्तव्य करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माढ्याच्या सभेत थेट शरद पवार यांचे नाव न घेता जोरदार टीकास्त्र सोडले.

माढा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ आज सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस येथे जाहीर सभा झाली. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते. देशात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपली ताकद पणाला लावली आहे. तसेच विविध राजकीय पक्षांकडून प्रचार सभा व जाहीर सभा घेण्यात येत आहेत. मतदानाचा तिसरा टप्पा ७ मे रोजी आहे. त्या पार्श्वभूमीवर सभांचा धडाका सुरू आहे. मोदी पुढे म्हणाले की, ही वारकरी संप्रदायाची भूमी असून मी विकसित भारतासाठी आपले आशीर्वाद मागण्यासाठी आलो आहे. मी कोणत्याही सभेला वेळेआधीच पोहोचतो. मी कायम आपल्या सेवेत राहणार असून काँग्रेसने जे ६० वर्षात केले नाही, ते भाजपा सरकारने १० वर्षात करून दाखवले आहे, असे मोदी म्हणाले.

या ठिकाणी पंतप्रधान मोदी यांनी काठी आणि घोंगडे नागरिकांना दाखवताच एकच जल्लोष झाला. मोदी यांनी डोक्यावर पिवळा फेटा, खांद्यावर घोंगडी आणि हातात काठी घेऊन मंचावर प्रवेश केला. येळकोट,येळकोट जय मल्हार, बाळूमामाच्या नावाने चांगभलं असा उद्घोष करत मोदी यांनी उपस्थितांची मने जिंकली. सभेला महिलांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. उन्हात व लांबून आलेल्या महिला व कार्यकर्त्यांची मोदी यांनी दखल घेतली. काँग्रेस गरीबीबाबत करीत असलेल्या ढोंगीपणाबाबत त्यांनी खरपूस समाचार घेतला. दहा वर्षात झालेला पालखी मार्ग व पंढरपूर विकासाचा त्यांनी यावेळी उल्लेख केला. विदर्भ व मराठवाड्याला थेंब-थेंब पाण्यासाठी काँग्रेसवाल्यांनी तरसावले. काँग्रेसला ६० वर्षे विकास कामाची संधी होती. पण त्यांनी काहीही केलेले नाही, असा आरोपही त्यांनी केला.

राज्यात सिंचनाच्या २६ योजना सुरू केल्या
२०१४ नंतर खरा विकास सुरू झाला, महाराष्ट्रात सिंचनाच्या २६ योजना सुरू केल्या. शेतात पाणी पोचविण्याचे काम आम्ही केले. २५ कोटी लोकांना गरिबीरेषेतून बाहेर काढल,े असे मोदी यांनी म्हटले. पीएम किसान सन्मान निधीअंतर्गत शेतक-यांना हजारो कोटी रूपये मिळाल्याचे मोदी यांनी सांगितले. माढा लोकसभा मतदारसंघातील नागरिकांनी सभेला मोठी गर्दी केली होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR