मुंबई : प्रतिनिधी
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना अतिरिक्त सुरक्षा पुरवण्यात आली आहे. ही सुरक्षा एका खासगी उद्योग समूहाकडून पुरवण्यात आली. ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीवरील सुरक्षा गेल्या वर्षी कमी करण्यात आली होती. यानंतर आता ठाकरेंना एका खासगी उद्योग समूहाकडून सुरक्षा पुरवण्यात आली आहे.
सध्या उद्धव ठाकरेंना झेड दर्जाची सुरक्षा आहे. त्यांच्या सुरक्षेसाठी मुंबई पोलिस तैनात असतात. पोलिस सुरक्षा तैनात असताना आता ठाकरेंना खासगी सुरक्षादेखील असेल. गेल्याच वर्षी मातोश्रीवरील सुरक्षेत कपात करण्यात आली. त्यामुळे मातोश्रीवरील पोलिस बंदोबस्त काही प्रमाणात घटला. आता त्यांची जागा खासगी सुरक्षा रक्षक घेतील. ठाकरेंना खासगी उद्योग समूहाकडून ८ सुरक्षा रक्षक पुरवण्यात आलेले आहेत.
उद्धव ठाकरेंच्या घराजवळ हल्ला करण्याचा कट रचला जात असल्याचा एक फोन गेल्या वर्षी आला होता. मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला आला होता. त्यानंतर मातोश्रीवरील सुरक्षा वाढविण्यात आली. २०२३ मध्ये ठाकरेंना असलेली झेड प्लस सुरक्षा कमी करण्यात आली. त्यानंतर आदित्य ठाकरेंनी केंद्र सरकारवर शाब्दिक हल्ला चढवला होता.