27.5 C
Latur
Sunday, May 12, 2024
Homeलातूरप्रियंकांनी जिंकली उदगीरची सभा!

प्रियंकांनी जिंकली उदगीरची सभा!

मतदार संघामध्ये काँग्रेसमय वातावरण

जळकोट : ओमकार सोनटक्के
काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांची लातूर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ.शिवाजीराव काळगे यांच्या प्रचारार्थ उदगीर येथे दिनांक २७ एप्रिल रोजी सभा पार पडली. प्रचंड ऊन असताना ४१ अंश सेल्सिअस तापमानात देखील सभेला नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती . प्रियंका गांधी यांच्या सभेमुळे उदगीर-जळकोट मतदार संघामध्ये काँग्रेसमय वातावरण झालेले आहे .

काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्या प्रियंका गांधी यांच्या सभेसाठी स्वयंस्फूर्तपणे नागरिकांची उपस्थिती होती. दुपारी तीनला आयोजित असलेली सभा चार वाजता सुरू झाली, प्रियंका गांधी यांचे भाषण साडेचार वाजता सुरू झाले तोपर्यंत सभामंडपामधील एकही व्यक्ती जागेवरून हलला नाही हे या सभेचे वैशिष्ट्य होते . सभा संपल्यानंतर नागरिक हे एकमेकाशी हितगुज करताना प्रियंका गांधी यांच्या भाषणाचीच चर्चा करत होते.
काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्या प्रियंका गांधी यांचे भाषण सर्वसामान्य नागरिकाला समजणारे असे होते, त्यांचे भाषण सुरू असताना टाचणीचा देखील आवाज येईल एवढी शांतता सभा मंडपामध्ये होती. प्रियंका गांधी यांनी त्यांचे भाषण हे अतिशय मुद्देसूद पणे मांडले , सध्या सुरू असलेली महागाई , नोकरीसाठी भटकंती करणारा युवक, शेतक-यांच्या शेतीमालाला नसलेला भाव, जीएसटीच्या माध्यमातून सर्वसामान्यांची होत असलेले लूट, वाढलेले पेट्रोल आणि डिझेलचे भाव , वाढलेले गॅसचे भाव याविषयी सविस्तर असे मार्गदर्शन केले .

यासोबत काँग्रेसचे सरकार आल्यानंतर प्रत्येक गरीब कुटुंबातील महिलेला वर्षाला एक लाख रुपये देणार , शेतक-यांना आवश्यक असलेल्या वस्तूंवर लावण्यात आलेला जीएसटी कर रद्द करणार, डिग्री घेतलेल्या प्रत्येक युवकाला सरकारी नोकरी देणार , शेतक-यांना कर्जमाफी देणार, जेव्हा शेतक-यांना कर्जमाफीची गरज असेल तेव्हा त्यांना देण्यासाठी आयोगाची स्थापना करणार , शेतक-यांना एमएसपी प्रमाणे शेतीमालाला भाव देणार अशी अनेक आश्वासने त्यांनी यावेळी दिली. यासोबतच त्यांनी पुढचे येणारे सरकार हे कुणा एकाचे असणार नाही तर ते जनतेचे असणार आहे असे सांगताच उपस्थित नागरिकांनी टाळ्याच्या गजरात याचे स्वागत केले .

काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी त्यांच्या भाषणाची सुरुवात राष्ट्रसंत शिवंिलग शिवाचार्य महाराज यांच्या नामस्मरणाने केली . या सभेमध्ये त्यांनी माजी मुख्यमंत्री लोकनेते विलासराव देशमुख यांची देखील आठवण काढली . काँग्रेसचे नेते प्रियांका गांधी यांची सभा रेकॉर्ड ब्रेक अशी झाली, अनेक मोठ्या नेत्यांच्या सभा होतात परंतु सामान्य माणसाला समजेल असे भाषण प्रियंका गांधी यांचे झाले . अनेक मोठमोठ्या सभेमध्ये भाषण सुरू असतानाच नागरिक हे उठून जात असल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले . परंतु प्रियंका गांधी यांचे भाषण सुरू असताना एकही व्यक्ती सभामंडप सोडून गेलेला दिसून आला नाही .

सभा मंडपामध्ये बसलेल्या प्रत्येक व्यक्तीला प्रियंका गांधी या आणखीन जास्त वेळ बोलाव्यात त्यांचे बोलणे आणखीन ऐकावे असेच वाटत होते. भाषण झाल्यानंतर प्रियांका गांधी यांनी सुरक्षा कवच तोडून सभा मंडपामध्ये उपस्थित महिलांना भेटल्या , त्यांच्यासोबत सेल्फी काढली , हा त्यांचा साधेपणा उपस्थित नागरिकांना खूप आवडला . सभा ऐकून गावामध्ये परत आलेले नागरिक हे प्रियंका गांधी यांच्या भाषणाची चर्चा करत होते .

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR