नवी दिल्ली : लवकरच लष्कराची ताकद आणखी वाढणार आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली ३० नोव्हेंबर रोजी संरक्षण खरेदी परिषदेची बैठक होणार आहे. या बैठकीत लष्करासाठी १४० अटॅक हेलिकॉप्टरच्या खरेदीला मंजुरी दिली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हा करार ४५ हजार कोटी रुपयांचा असणार असून लष्कराला ९० हेलिकॉप्टर आणि हवाई दलाला ५५ हेलिकॉप्टर मिळणार आहेत. हे हेलिकॉप्टर एचएएलने बनवले असून लष्कराच्या आवश्यकतेनुसार ते तयार करण्यात आले आहेत. हे वाळवंटापासून सियाचीन आणि पूर्व लडाखपर्यंत कार्य करू शकतात.
प्रचंड असे या हेलिकॉप्टरचे नाव आहे. हे एकमेव अटॅक हेलिकॉप्टर आहे, जे १६४०० फुटांवर उतरू आणि टेक ऑफ करू शकते. हे ५० फुटांपेक्षा जास्त लांब आणि सुमारे १५ फूट उंच आहे. हेलिकॉप्टर ५.८ टन वजनाची शस्त्रे आणि क्षेपणास्त्रांसह उड्डाण करू शकते. याचा तशी वेग २६८ किमी असून यात दोन इंजिन आणि दोन पायलट याला ऑपरेट करतात.
प्रचंड हेलिकॉप्टर २० एमएम कॅलिबर गन आणि ७० एमएम रॉकेटने सुसज्ज आहे. हे हवेतून हवेत आणि हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांनी सुसज्ज आहे. शत्रूचे रणगाडे, बंकर आणि ड्रोन देखील नष्ट केले जाऊ शकते. हे हेलिकॉप्टर पुढील तीन-चार दशकांतील उदयोन्मुख आव्हानांना तोंड देण्यास सक्षम आहे.