28.5 C
Latur
Sunday, July 6, 2025
Homeसंपादकीयप्रचाराचा नारळ फुटला!

प्रचाराचा नारळ फुटला!

चोवीस बाय सात निवडणुकीच्या तयारीत राहणे, प्रचारात आघाडीवर राहणे, आपल्या प्रचाराचे नॅरेटिव्ह वा अजेंडा सेट करून त्यावर चोहोबाजूंनी प्रचंड चर्चा घडवून आणून विरोधकांना आपल्या अजेंड्यावर खेळण्यास भाग पाडणे अशा बाबींमध्ये विद्यमान सत्ताधारी असणा-या भाजपचा हातखंडाच आहे! मागच्या दहा वर्षांतील विविध निवडणुकांमध्ये देशातील सर्वच राजकीय पक्षांना व मतदारांनाही त्याचा विपुल अनुभव आलेला आहेच. त्यामुळे यावेळीही आगामी लोकसभा निवडणुकीसाठीही भाजपची हीच रणनीती असणार याचा सर्वांनाच अंदाज आहे. या अंदाजानुसार येत्या २२ जानेवारी रोजी अयोध्येत रामलल्लांची राममंदिरात प्रतिष्ठापना झाली की, देशाचे प्रधानसेवक नरेंद्र मोदी आपल्या पक्षाच्या उद्दिष्टपूर्तीचे मुहूर्त साधून लोकसभा निवडणुकीच्या आपल्या पक्षाच्या प्रचाराचा नारळ वाढविणार हाच सर्वांचा होरा होता व त्याचा सामना करण्याची तयारीही विरोधी पक्षांनी केली होती.

मात्र, विविध विकास कामांचे लोकार्पण व उद्घाटन करण्यासाठी शुक्रवारी महाराष्ट्र दौ-यावर आलेल्या नरेंद्र मोदींनी अतिशय चाणाक्षपणे विरोधकांना बेसावध गाठून अयोध्येतील राममंदिराऐवजी नाशकातील काळाराम मंदिरातून भाजपच्या लोकसभा निवडणूक प्रचाराचा नारळ वाढवत पुन्हा एकदा सगळ्यांनाच चकवा दिला आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षात महाविकास आघाडीचे सरकार पाडून सत्ता प्राप्त करण्याचा व या संदर्भातील अपात्रता प्रकरणात विधानसभा अध्यक्षांनी शिंदेंची शिवसेना खरी असल्याचा निकाल देऊन उद्धव ठाकरे यांच्या गटाला आणि पर्यायाने महाविकास आघाडीला जोरदार धक्का दिल्याच्या पार्श्वभूमीवर निकालाच्या दुस-याच दिवशी महाराष्ट्र दौ-यावर आलेल्या मोदींनी दक्षिण काशी मानल्या जाणा-या नाशकातून प्रचाराचा नारळ वाढवत सर्वांनाच जोरदार धक्का दिला आहे. त्यासाठी त्यांनी एकीकडे हिंदुत्वाचा शिगोशीग परिवेष तर दुसरीकडे जनसामान्यांच्या हिताच्या योजनांची बरसात असा दुहेरी अजेंडा सेट करण्याचा प्रयत्न केला आहे.

लोकसभेसाठीच्या प्रचारात हा दुहेरी अजेंडा सफाईदारपणे कसा वापरायचा याचे प्रात्यक्षिकच मोदींनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्र्यांना दिवसभराच्या दौ-यात दिले. अयोध्येतील राममंदिर उद्घाटनावर बहिष्काराचे अस्त्र उगारून भाजपच्या अजेंड्याला उत्तर देण्याची तयारी करत असलेले विरोधी पक्ष मोदींनी महाराष्ट्रातून सेट केलेल्या या दुहेरी अजेंड्याचा सामना कसा करणार याची आता उत्सुकता असेल. तसेही मोदी सत्तेवर आल्यापासून विकासकामांच्या उद्घाटनाला ‘इव्हेंट’चे रूप देऊन जनतेवर गारूड कसे निर्माण करायचे याचा एक नवा फॉर्म्युला त्यांनी सेट केला आहे. त्यानुसार एकाच वेळी अनेक योजनांचे उद्घाटन, भूमिपूजन, शिलान्यास, लोकार्पण आदी बाबी एकत्र करायच्या व अशा सगळ्या एकत्र कामांची बेरीज करून येणारा हजारो कोटी बजेटचा आकडा जनतेसमोर मांडून देशाच्या गतिमान व भव्यदिव्य विकासाचे स्वप्न त्यांच्या डोळ्यांत उतरवायचे हा तो फॉर्म्युला! महाराष्ट्र दौ-यात मोदींनी हाच फॉर्म्युला वापरून विविध विकास कामांचे लोकार्पण, उद्घाटन, परिचालन करून ‘सर्वांगीण विकास हीच मोदींची गॅरंटी’ अशी आरोळी ठोकली! प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसवर हल्ला चढवताना ‘आता देशात मेगा स्कॅमची नव्हे तर मेगा प्रोजेक्टची चर्चा होतेय,’ असा चिमटा काढला.

त्याचवेळी उद्धव ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीवर जुनाच घराणेशाहीचा आरोप लावताना त्यांनी ही घराणेशाही संपविण्यासाठी तरुणांनी राजकीय क्षेत्रात यावे, असे आवाहन करत तरुणाईच्या काळजाला हात घालण्याचा नवा प्रयत्न केला. नाशकात युवा महोत्सवात बोलताना मोदींनी हा नवा भारत उद्या तुमच्या ताब्यात असणार आहे आणि तुमच्यासाठीच आज आम्ही तो घडवत आहोत,’ अशी साद घालत पिढ्यांचे अंतर एका मिनिटात कमी करून तरुणाईला आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. विरोधकांनी जातजनगणनेचा मुद्दा उचलून धरल्यावर त्याला उत्तर म्हणून मोदींनी देशात तरुण, गरीब, महिला आणि शेतकरी या चारच जाती असल्याचे आपण मानतो, असे म्हटले होते. त्यातून महाराष्ट्रासह देशात आरक्षणाच्या मागणीवरून होत असलेल्या आंदोलनाचा व त्यातून पुढे येत असलेल्या जातगणनेच्या मागणीचा विरोधी पक्षांनी राजकीय वापर केल्यास त्याला भाजपचे काय उत्तर असेल हे स्पष्ट झालेच होते. महाराष्ट्रातील मराठा आरक्षणाच्या आंदोलनाने कोंडीत सापडलेल्या राज्य सरकारला व स्वपक्षाला ही कोंडी कशी फोडायची त्याचा मार्ग नरेंद्र मोदी यांनी युवा महोत्सवातील तरुणाईसमोर केलेल्या आपल्या भाषणातून दाखवून दिला आहे.

त्यातूनच ते नाशकात देशातील तरुणाईला ‘इतिहास घडवण्याची’ साद घालत होते. तर नवी मुंबईतील भाषणात त्यांनी महिलांचा खास व सविस्तर उल्लेख करून महिलांना आकर्षित करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला. अर्थात असे प्रयत्न करताना त्यांनी अचूक टायमिंग साधलेले असते हे त्या कार्यक्रमाचे स्वरूप लक्षात घेता नक्कीच मान्य करावे लागते. अटल सेतूसारख्या महत्त्वाच्या प्रकल्पाच्या उद्घाटनाचे निमित्त साधत नरेंद्र मोदी यांनी नाशकात व नवी मुंबईतही जोरदार रोड शो करून लोकसभा निवडणूक प्रचाराचा नारळ वाढविण्याचे टायमिंग साधले आणि सर्वांनाच धक्का दिला. तसेही धक्कातंत्र ही मोदींची कार्यशैलीच आहे. मात्र, तरीही त्यांनी लोकसभा निवडणूक प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी अयोध्येतील रामलल्लांच्या प्रतिष्ठापनेऐवजी नाशकातील काळारामच्या दर्शनाचा मुहूर्त निवडावा, हे सर्वांनाच जोरदार धक्का देणारे आहे. मोदींच्या या धक्कातंत्राने अपेक्षेपेक्षा ११ दिवस आधीच प्रचाराचा नारळ फुटला आहे. तिस-यांदा देशाची सत्ता प्राप्त करण्याचा आत्मविश्वास व्यक्त करणा-या मोदींच्या या आत्मविश्वासाची भिस्त भाजपच्या महाराष्ट्रातील यशावर आहे.

मात्र, महाविकास आघाडीच्या रूपाने भाजपसमोर महाराष्ट्रात निर्माण झालेले तगडे आव्हान भाजपने शिवसेना व राष्ट्रवादीत फोडाफोडी केल्यावरही कायम आहे. कदाचित याची पुरती जाणीव झाल्यानेच नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातून लोकसभा प्रचाराचा नारळ फोडण्याचा निर्णय घेतला असावा! या निर्णयाने महाविकास आघाडीला प्रचारात पिछाडीवर ढकलणे व राज्य सरकारला प्रचाराची राळ उडवून आघाडी घेण्यास उद्युक्त करणे असे दोन पक्षी एकाच दगडात मारण्याचा प्रयत्न मोदी यांनी केला आहे. राज्यातील सत्ताधा-यांना योग्य तो संदेश मिळालाच असल्याने सरकारकडून मतदारांना आचारसंहितेपूर्वीच प्रभावित करता येणा-या घोषणांचा पाऊस आता पाडला जाईलच! त्याला उत्तर देण्यासाठी आता महाविकास आघाडीतील सर्व पक्षांना तातडीने कामाला लागावे लागेल. महाविकास आघाडीसाठी एकेक दिवस आता अत्यंत मोलाचा आहे. त्याचे भान ठेवून कामाला लागले व भाजपच्या आक्रमक प्रचाराला तेवढेच जोरदार उत्तर दिले तरच राज्यातील महाविकास आघाडीला आपली प्रचारातील पिछाडी भरून काढता येईल, हे मात्र निश्चित!

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR