पूर्णा : तालुक्यातील कात्नेश्वर येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय जिवनासोबतच व्यवहारीक ज्ञान देखील मिळावे या उद्देशाने आनंद नगरी मेळाव्याचे दि. १३ जानेवारी रोजी आयोजन करण्यात आले होते. यात विद्यार्थ्यांनी विविध चविष्ट खाद्य पदार्थांचे ७५ स्टॉल उभारले होते. २ तासात विविध पदार्थाच्या विक्रीतून विद्यार्थ्यांनी ११ हजार ५०० रुपयांची कमाई केली.
विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच व्यवसाय कसा करावा लागतो व त्यातुन दोन पैसे मिळविताना कशाप्रकारे अडचणीला तोंड द्यावे लागते याचा अनुभव यावा. तसेच नफा तोटा या संकल्पना प्रत्यक्ष जीवनानुभवातून समजून घेता याव्यात या हेतूने शाळेत आनंद नगरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. अशा उपक्रमातून विद्यार्थ्यांना कमवा आणि शिका याची जाणीव होऊन त्यांच्यात अशी मूल्य रुजवण्यास मोठ्या प्रमाणात मदत होते. मेळाव्यात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी घरुनच खाद्य पदार्थ बनवून आणुन शालेय आवारात स्टॉल्स लावले. खरेदी करण्यासाठी आलेल्या ग्राहकांना विद्यार्थी आकर्षित करण्याचा प्रयत्न करीत होते. या मेळाव्याला एकप्रकारे बाजाराचे स्वरूप प्राप्त झाले होते. आनंदनगरीला गावातील पालकांनी, प्रतिष्ठित व्यक्तींनी, शिक्षणप्रेमींनी, युवकांनी व ग्रामस्थांनी उस्फूर्तपणे प्रतिसाद दिला.