बीड : वाल्मीक कराड याला पहिल्या दिवसांपासून संरक्षण आहे. माध्यमात काही दिवसापूर्वी त्यांच्याकडे अमेरिकेतील सीम कार्ड असल्याचे समोर आले आहे, त्यामुळे त्यांचे कॉन्टक्ट कुठेपर्यंत आहेत हे लक्षात येते. त्यांना अटक व्हायला किती उशीर झाला? अटक होऊन सुद्धा कटकारस्थानमध्ये अजूनही नाव घेतलेले नाही, एक तर मास्टरमाईंड वाल्मीक कराड आहे. वाल्मीक कराड यांना मंत्री धनंजय मुंडे यांचे संरक्षण आहे हे स्पष्ट दिसून येत आहे, असा आरोप आमदार संदीप क्षीरसागर यांनी केला. बीडमध्ये आज आमदार संदीप क्षीरसागर यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले.
पवनचक्की कंपनींला खंडणी मागितल्या प्रकरणी संशयीत आरोपी वाल्मीक कराड याची चौकशी सुरू आहे. वाल्मीक कराड याच्याविरोधात मकोका गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस कोठडी सुनावण्यात आली. एसआयटीने ताब्यात घेऊन आता चौकशी सुरू आहे. दरम्यान आता या प्रकरणावरुन राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. आमदार संदीप क्षीरसागर म्हणाले, वाल्मीक कराड ज्या पद्धतीने सरेंडर होतात, ज्या पद्धतीने प्रशासनासमोर जातात. लॉकअपमध्ये त्यांच्या अंगावरील गमजा तसाच राहतो. त्यांच्यापर्यंत तपास आला की जाग्यावर थांबतो. या प्रकरणात त्यांचा सीडीआर तपासला तर सर्व गोष्टी समोर येतील असा दावाही संदीप क्षीरसागर म्हणाले. या प्रकरणात ज्या पद्धतीने त्यांची संपत्ती बाहेर येत आहे. त्या पद्धतीत ईडीने तपास करायला पाहिजे. ईडीने व्यवहार बघितले तर सर्व गोष्टी समोर येतील असेही संदीप क्षीरसागर म्हणाले.
त्या भागातील व्यापा-यांसोबत माझी चर्चा झाली. ती लोक आता पहिल्यांदा उघड उघड बोलत आहेत. त्यांच्यावरही अन्याय झाला आहे. आता सर्व गोष्टी बाहेर येतील. पोलीस प्रशासनाने जर ठरवले तर कोणालाही ते अटक करु शकतात. वाल्मीक कराड याचे अमेरिकेपर्यंत हात असू शकतात का? यामागे कोणाचा तरी मोठा हात अशू शकतो, असा दावाही क्षीरसागर यांनी केला.