नाशिक : जिल्ह्यातील मालेगाव ३ वर्षीय चिमुरडीवरील बलात्कार व हत्येच्या प्रकरणामुळे होरपळून निघाले असून या घटनेच्या निषेधार्थ येथील नागरिकांनी शुक्रवारी मालेगाव बंदची हाक देऊन मोर्चा काढला होता. पण मोर्चेक-यांनी थेट स्थानिक न्यायालयाच्या इमारतीत शिरण्याच्या प्रयत्न केल्याने पोलिसांनी आंदोलकांवर सौम्य लाठीमार केला.
मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात एका ३ वर्षीय मुलीवर गावातीलच विजय संजय खैरनार नामक आरोपीने पाशवी बलात्कार केला होता. त्यानंतर दगडाने ठेचून तिची निर्घृण हत्याही केली होती. या प्रकरणाचे सध्या राज्यभरात संतप्त पडसाद उमटत आहेत. या प्रकरणी नागरिकांनी शुक्रवारी मालेगाव बंदची हाक दिली होती. त्याला व्यापारी संघटना, शाळा व महाविद्यालये, विविध सामाजिक व राजकीय संघटनांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या प्रकरणी रामसेतू पुलावरून एक मोर्चाही काढण्यात आला. त्यानंतर अप्पर जिल्हाधिका-यांना निवेदन देण्यात आला. यावेळी मोर्चक-यांनी आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. या मोर्चात मंत्री दादा भुसेही सहभागी झाले होते.
मोर्चेकरी आक्रमक
यावेळी काही मोर्चेक-यांनी अचानक स्थानिक न्यायालयाच्या परिसरात शिरण्याचा प्रयत्न केल्यामुळे एकच खळबळ माजली. मोर्चेकरी थेट कोर्टाच्या इमारतीत शिरण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी त्यांची पोलिसांशी झटापट झाली. पोलिसांनी प्रसंगावधान राखून मोर्चेक-यांना न्यायालय परिसरात प्रवेश न करता आपल्या मार्गाने जाण्याचे आवाहन केले. पण मोर्चेक-यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. अखेर परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी त्यांच्यावर सौम्य लाठीमार केला. हे पाहून मोर्चेक-यांची एकच धावपळ उडाली. या घटनेत काही जण किरकोळ जखमी झाले. या घटनेनंतर शेकडो मोर्चेकरी कोर्टाच्या परिसरात जमले होते. तिथे त्यांची आणखी समजूत काढण्याचा प्रयत्न केला गेला. या घटनेनंतर कोर्टाचे दरवाजे बंद करण्यात आले आहेत.
आरोपीची बाजू एकही वकील मांडणार नाही : मंत्री भुसे
मोर्चाला मार्गदर्शन करताना राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी शहरातील एकही वकील आरोपीची बाजू मांडणार नसल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले, मालेगावच्या वकील संघाने बालिकेवर अत्याचार करणा-या आरोपीची बाजू कोर्टात न मांडण्याचा निर्णय घेतला आहे. आरोपीची पोलिस कोठडी संपलेली असताना आपले डीवायएसपी बाविस्कर यांनी न्यायालयीन कोठडीची मागणी केली, हे निषेधार्थ आहे. त्याचा मी धिक्कार करतो.
न्यायालयीन कोठडी का मागीतली?
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी या प्रकरणाची दखल घेतली. त्यांनी हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची भूमिका घेतली असताना डीवायएसपींनी न्यायालयीन कोठडी मागितली. हे कुणाच्या सांगण्यावरून केले? असा संतप्त सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. या प्रकरणामुळे राज्यात संतापाची लाट उसळली आहे. मी मागी केल्यानंतर पोलिसांनी एमसीआरची मागणी बदलून पीसीआरची मागणी केली. त्यामुळे या डीवायएसपींची बदली झाली पाहिजे. त्याच्यावर निलंबनाची कारवाई झाली पाहिजे, असे भुसे म्हणाले.
उद्या सरकारविरोधातही उद्रेक : वडेट्टीवार
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मालेगावात आज झालेला जनतेचा उद्रेक उद्या सरकार विरोधात होण्याचा इशारा दिला आहे. ते म्हणाले, मालेगाव इथे आज जमाव कोर्टात शिरला हा जनतेचा उद्रेक आहे. हा उद्रेक आज गुन्हेगाराविरोधात आहे. उद्या तो सरकार विरोधात होईल. एकेकाळी महाराष्ट्र पोलिसांचा दरारा होता, आता गुन्हेगारांवर धाक राहिलेला नाही.गुन्हेगारांची हिंमत वाढली आहे.
महिलांचा पोलिसांना गराडा
उल्लेखनीय बाब म्हणजे या प्रकरणातील आरोपीची ५ दिवसांची पोलिस कोठडी काल संपुष्टात आली होती. त्याला कोर्टात सादर करत असताना संतप्त महिलांनी पोलिसाना गराडा घातला. यामुळे बाका प्रसंग उद्धवला होता.

